ठाणे : कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचे चित्र गेले अनेक वर्षे दिसून येत असतानाच, बुधवारी मात्र वेगळे चित्र दिसून आले. ठाणे महापालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाड यांना निमंत्रण दिले आणि आव्हाडही बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. ठाणे शहरासह कळवा-मुंब्य्रातील प्रकल्पांबाबत शिंदे आणि आव्हाडांची हसत-खेळत बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी, या दोन्ही नेत्यांची जूनी मैत्री सर्वश्रृत आहे. असे असले तरी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विळा-भोपळ्याचे नाते आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्याविरोधात त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला यांनी निवडणुक लढविली. या निवडणुकीत खासदार शिंदे यांनी मुल्ला यांच्या पाठीमागे ताकद उभी केली होती. हे दोन्ही नेते जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा टिकाटिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत, असे चित्र आजवर राहिले आहे. असे असतानाच, ठाणे महापालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाड यांना निमंत्रण दिले आणि आव्हाड हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. ऐरवी मतदार संघातील निधी वाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, बुधवारच्या बैठकीत मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेंक्शन सेंटर, कोलशेत येथील टाऊन पार्क, कळव्यातील यशवंत रामा साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी, खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह आदी प्रकल्पांवर दोन्ही नेत्यांमध्ये हसत-खेळत चर्चा झाली. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या दिलजमाईची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेना (शिंदे गट)पक्षाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचेही मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत त्यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे चित्र दिसून आले होते. म्हस्के आणि आव्हाड हे दोन्ही नेते एकमेकांवर टिका करताना दिसून येत होते. बुधवारी मात्र म्हस्के सुद्धा बैठकीला उपस्थित होते आणि तेही आव्हाडांच्या बाजूलाच बसले होते. याशिवाय, आव्हाड यांच्याविरोधात निवडणुक लढविणारे नजीब मुल्ला हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, खासदार शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी काॅफी आणण्यास सांगितली. ही काॅफी कर्मचाऱ्यांनी आणून दिली. पण, गरम काॅफीमुळे कप पकडताना चटके बसत होते. त्यावर काॅफीचा कप सांभाळून पकडा नाहीतर काॅफी खाली सांडेल, असे शिंदे म्हणाले. त्यावर माझ्या हाताच काही लागत नाही तर, सांडण्याचा प्रश्न येत नाही, असे आव्हाड म्हणाले आणि त्यानंतर बैठकीच्या सभागृहात एकच हश्या पिकला.

महायुती आणि महाविकास आघाडी यामुळे आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत. परंतु शहराच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम केले तर, त्यात जनतेचा फायदा आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी या बैठक घेण्यात आली होती. नरेश म्हस्के खासदार, शिवसेना (शिंदे गट)