अंबरनाथः संजय राऊत यांची महाराष्ट्राला गरज आहे, त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे सकाळचे मनोरंजन होणार नाही, त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर टोलेबाजी केली. अंबरनाथच्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी सजंय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. संजय राऊत आभासी विश्वात जगत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कल्याण लोकसभेचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र दोन दिवस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र गुरुवारी अंबरनाथमध्ये आलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांना माध्यमांनी छेडल्यानंतर त्यांनी यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर मार्मिक शब्दात टोलेबाजी केली.
हेही वाचा – डोंबिवलीत घरफोड्या वाढल्या
हेही वाचा – कल्याणमधील पोलिसांनी शोधले हरवलेले ४४ मोबाईल
संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद आहेत. एकीकडे ते पोलिसांना चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देतात, दुसरीकडे आपल्या जबाबात तेच म्हणतात की, माझ्यावर शाईफेक केली जाईल किंवा धक्काबुक्की केली जाईल. त्यांचे सहकारी सहायक संपादक चिंदरकर सांगतात की, मी त्यांना फक्त काळजी घ्या, असे सांगितले होते. मी कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा काय करणार हे सांगितले नव्हते, असे खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे संजय राऊत यांची मला काळजी वाटते. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला, असे लक्षण दिसत आहे. त्यात रुग्णाला भास होतात. मला कुणीतरी आवाज देतो, असे वाटते, असे सांगत डॉ. शिंदे यांनी राऊत यांना टोला लगावला. राऊत यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत राऊतांमुळे महाराष्ट्रातील जनेतेचे सकाळचे मनोरंजन होत असल्याचाही टोला त्यांनी लगावला.