भाजपा आणि शिंदे गटाने प्रत्येक आठवड्याला आमचा एक-एक माणूस फोडत राहावा. बिनकामी सगळी माणसे तुम्हाला घ्या, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर शनिवारी ( २९ जुलै ) केला होता. याला आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही काळजी करू नका एक-एक करून सगळेच आमच्याकडे येणार आहेत, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“भाजपा आणि शिंदे गटाने इतके प्रयत्न करूनही शिवसेना संपलेली नाही. इतके सगळे होऊनही शिवसेना संपत कशी नाही, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत आहे. मात्र, मी भाजपा आणि शिंदे गटाचा आभारी आहे. त्यांनी प्रत्येक आठवड्याला आमचा एक-एक माणूस फोडत राहावा. बिनकामाची सगळी माणसं तुम्हाला घ्या. पण, यामुळे शिवसैनिक हे पुन्हा पेटून उठतात. त्यामुळे भाजपा आणि शिंदे गट जे काम करत आहे, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना पुन्हा नव्याने जोमाने उभी राहत आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अन्…”, भाजपा मंत्र्याचं आव्हान
यावर ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “पदाधिकारी आणि नगरसेवकांचे प्रवेश येणाऱ्या काळात अजून वाढणार आहेत. कोणीतरी सांगितलं, ‘एक-एक करून काय घेता, सगळेच घ्या.’ तुम्ही काळजी करू नका, एक-एक करून सगळेच याठिकाणी येणार आहेत. आपल्या कुटुंबातील लोक का सोडून जात आहेत? याचे अगोदर आत्मपरिक्षण करा. त्यानंतर सर्व उत्तर मिळतील.”
‘धर्मवीर आनंद दिघे हे निष्ठावंत होते. त्यांचं गद्दारांबरोबर नाव जोडू नका,’ असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. त्यावर प्रश्न विचारताच श्रीकांत शिंदे संतापले. “पुन्हा त्यांचे प्रश्न विचारत जाऊ नका. आम्हाला तेवढा वेळ नाही आहे. आम्हाला चांगली कामे करायची आहेत,” असं श्रीकांत शिंदे म्हणाले.