आजची मुले अतिशय हुशार, प्रचंड ऊर्जा असलेली आणि वेगाने सर्व काही आत्मसात करू पाहणारी आहेत. त्यामुळे त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य पर्याय देणे हे पालकांसाठी खरोखरच आव्हान ठरते. समाजाची ही गरज ओळखून श्वेता फडके या गेली दोन वर्षे बालोपासना हा उपक्रम राबवीत आहेत.
श्वेता फडके यांना सरस्वती मंदिर पूर्वप्राथमिक विभागातील शिक्षिका. पालक आणि शिक्षिका असा दुहेरी अनुभव गाठीशी असल्याने त्यांना उपक्रमाचा आराखडा करण्यास मदतच झाली. ३ ते ८ वयातील मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीचे टप्पे लक्षात घेऊन त्यांनी आराखडा तयार केला आहे. सध्याच्या शहरी धावपळीच्या आयुष्यात काही मुलांना रोज मैदानावर किंवा छंदवर्गाला घेऊन जाणे पालकांना शक्य होत नाही हे लक्षात घेऊन ‘बालोपासना’ हा वर्ग आठवडय़ातून फक्त शनिवारी ५ ते ७.३० या वेळेत घेतला जातो. ३ ते ५ आणि ६ ते ८ वर्षे अशा दोन गटांत मुलांची विभागणी केली गेली आहे.
श्वेताताईंकडे शिक्षिकेचा अनुभव असल्याने या वयातील मुलांचे बालपण जपताना त्यांच्या विविध क्षमता (शारीरिक, सामाजिक, भाषिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक, व्यावहारिक, नैतिक, नेतृत्व) अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून विकसित करण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडे बालगीते, कविता, सुविचार यांचा खजिना आहे. शनिवारच्या सत्राची सुरुवात श्लोक, स्तोत्र यांनी होते. त्यानंतर अर्थपूर्ण गाणी, कविता यांचा परिचय (‘हात आपुले कशाला’ यासारखी) करून दिला जातो. मुलांची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांना विविध प्रकारच्या (कोळी, गरबा, इ.) नृत्यांबरोबर विविध राज्यांतील लोकनृत्ये शिकवली जातात. सध्या मुले गोव्याचे नृत्य शिकत आहेत.
बऱ्याचदा मुलांची खाण्याविषयीची खूप आवडनिवड असते. पालकांची ही समस्या लक्षात घेऊन श्वेताताईंनी पालकांना चार पर्याय दिले आहेत. फळे, मोड आलेली कडधान्ये, सॅलड्स, ड्रायफ्रुट्स यांचा वापर. पालक त्यांच्या सोयीने कोणताही पर्याय देऊ शकतात. खेळ घेतानादेखील त्यात वैविध्य असते. कोळी, स्मरणशक्तीचे विविध खेळ, उलटसुलट पाढे म्हणणे यामधून खेळाबरोबरच मुलांच्या क्षमतांचाही विकास होतो. अभ्यासातील संकल्पनाही स्पष्ट होतात. जुन्या-नव्याची सांगड घालताना गाणी-गोष्टींच्या माध्यमातून चांगले विचार रुजवण्याचा त्या जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अ-अभ्यास करा, आ-आळस टाळा ही बाराखडी मुलांना कळत नकळत खूप काही देऊन जाते.
मुलांच्या हाताचे स्नायू विकसित व्हावेत, त्यांना स्थिरता यावी, एकाग्रता वाढावी म्हणून चित्रकलेचा उपयोग केला जातो. आधी रेघोटय़ा, मग वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा, वर्तुळाची-त्रिकोणाची चित्रे, सणांची चित्रे असा चित्रकलेचा मुलांचा प्रवास असतो.
अखेरच्या सत्रात मुलांच्या वयाला झेपतील अशी आसने (कधी दंडस्थितीतील, कधी पोटावरची, कधी उलटे झोपून) असतात. त्यानंतर मग कधी ज्योतीवरचे त्राटक, कधी बोटावरचे त्राटक घेतले जाते. संध्याकाळी दिव्याचे श्लोक, शुभंकरोतीही म्हटले जाते. कधी मुले वेगवेगळे ओंकारही म्हणतात. (मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध इ.) मुले घरी जाताना म्हणतात, ‘आता नवीन आठवडा सुरू होणार आहे. मी छान वागणार आहे. आईबाबांना त्रास होईल असे वागणार नाही. शाळेत बाईंकडे लक्ष देणार आहे. डबा नीट खाणार आहे. मी शहाणा मुलगा/ मुलगी आहे’, अशा सकारात्मक विचारांची शिदोरी घेऊन मुले घरी जातात. बालोपासनेमध्ये तीस मुले आहेत. या मुलांच्या पालकांनी दाखवलेला विश्वास ही आपली जबाबदारी समजून त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न श्वेता फडके व त्यांच्या सहकारी करतात. त्यामुळे मे महिन्यातील शिबीरदेखील नावीन्यपूर्ण असण्यावर त्यांचा भर असतो. गेल्या वर्षीच्या शिबिरात सर्व प्रकारचे दिवस कृतज्ञता दिन, मातृ दिन आदी दिवस साजरे करण्यात आले होते. या उपक्रमाला अधिकाधिक व्यापक रूप देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. भविष्यात अजून कल्पना राबवायच्या आहेत, असे श्वेता फडके सांगतात.
हेमा आघारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा