तीन हात नाक्यापाठोपाठ अन्य चौकांतील मुलांच्या प्रवेशाला ‘हिरवा सिग्नल’

विकण्यापासून शिकण्याकडे वाटचाल करणाऱ्या ठाण्यातील सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अद्याप सुरूअसून आता इतरही काही सिग्नल्सवरील मुलेही या शाळेत येणार आहेत. तीन हात नाका सिग्नलवरील मुलांसोबतच कॅडबरी, मानपाडा, कळवा पूल, चरई, मुलुंड जकात नाका येथील सिग्नलवरील मुलांना तसेच कोपरी रेल्वे स्थानकातील मुलांना येत्या जून महिन्यात सिग्नल शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या बस सुविधेमुळे लांब पल्ल्यावरील सिग्नलवरील मुलांचा शाळेचा प्रवास सोयीचा होईल. सध्या सिग्नल शाळेत ३४ विद्यार्थी शिकत असून इतर सिग्नलवरील २२ विद्यार्थ्यांची भर पडून पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थीसंख्या ५६ होणार आहे.

सिग्नलवर भीक मागणाऱ्या किंवा वस्तूंची विक्री करणाऱ्या मुलांना शिक्षणाचे धडे मिळावे यासाठी समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तीन हात नाकाजवळ सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. दररोज काही वस्तूंची विक्री करणे किंवा भीक मागणे या साचेबद्ध जगण्यातून बाहेर पडलेल्या या मुलांचा शिकण्याचा प्रवास सुरू झाला आहे. सध्या या सिग्नल शाळेत ३४ विद्यार्थी तीन हात नाका चौकातीलच आहेत.

ठाणे शहरातील इतर सिग्नलवरील मुलांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी समर्थ भारत व्यासपीठतर्फे काही सिग्नलवरील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. सिग्नलवर भीक मागणाऱ्या, वस्तूंची विक्री करणाऱ्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांशी संवाद साधण्यात आला. यानुसार कॅडबरी, मानपाडा, कळवा पूल, चरई, मुलुंड जकात नाका येथील मुलांचाही सिग्नल शाळेत प्रवेश होणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस या सिग्नलवरील मुलांना आणण्यासाठी सकाळी नऊ वाजता महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली बस तीन हात नाका येथील सिग्नल शाळेतून निघेल. इतर सिग्नल्सवरील मुलांना घेऊन आल्यावर ११ वाजता शाळेचा वर्ग भरणार आहे. शाळा संपल्यावरही बसने मुलांना त्यांच्या ठिकाणी पोहचवण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे शिक्षकांची संख्याही वाढवण्यात आली असून सध्या सहा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत आहेत. शिक्षणाबरोबरच खेळाचाही आनंद विद्यार्थ्यांना घेता यावा, यासाठी सिग्नल शाळेत क्रीडा शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.

मे महिन्यातही शाळा

इतर शाळेतील विद्यार्थी मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेत असताना सिग्नल शाळेतील विद्यार्थी मात्र मे महिन्यातही नियमित शाळेत दाखल होत आहेत. शाळेच्या बाहेर पडल्यावर रस्त्यावरचेच जगणे असल्याने विद्यार्थ्यांना एक महिन्याची पूर्ण सुट्टी दिल्यास त्यांचे विक्री करणे किंवा भीक मागणे पुन्हा सुरू होईल. त्यामुळे अभ्यासाचा त्यांना पूर्ण विसर पडेल या उद्देशाने मुलांना सुट्टी देण्यात आली नाही, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

Story img Loader