होळी सण म्हणजे वसंतोत्सवाची चाहूल, हिवाळी संपल्याची आणि लवकरच उन्हाळा सुरू होत असल्याची नांदी असे बरेच काही बोलले जाते. मात्र सध्याच्या ग्लोबल वॉर्मिगच्या युगात कसला आलाय वसंत ऋतू? फाल्गुन पौर्णिमेच्या चार दिवस आधी चक्क पाऊस पडला. पुन्हा अवकाळी पावसासारखा आला आणि गेला असेही नाही. चांगला दोन दिवस मुक्कामी राहून बरसून गेला, वर्षां ऋतू असल्यासारखा. चांगलीच हुडहुडी भरली होती. त्यामुळे थंडी गेली म्हणून गुंडाळून ठेवलेले स्वेटर्स, मफलरी पुन्हा बाहेर काढावे लागले. आता खराखुरा निसर्गसुद्धा त्या बिल्डरांनी केलेल्या जाहिरातींसारखा फसवा वाटतो. काय काय सांगितलं होतं आम्हाला घर घेते वेळी? तरण तलाव काय, अद्ययावत जिमखाना काय. बाप रे बाप! अहो प्रत्यक्षात पुरेसे पाणीही मिळायची मारामार आहे. त्यामुळे यंदा खरेतर धुळवड खेळायची नाही, असा ठराव सोसायटीच्या कार्यकारिणीने मंजूर केला होता. मात्र कॉलनीतील बच्चे कंपनी आणि मुला-मुलींनी त्याला विरोध केला. त्यांचा हट्ट आणि दबावापुढे आमचे काही चालले नाही. सेक्रेटरी या नात्याने सण साजरे करण्याची परवानगी द्यावीच लागली.
तसे आम्ही वर्षभर सण साजरे करतो, पण हा एकच सण असा आहे की ज्या दिवशी दुसऱ्या मजल्यावरील अय्यरांपासून चौथ्या मजल्यावरील आपटय़ांपर्यंत सर्वजण हजर असतात. बाकी सुट्टीच्या दिवशीही बहुतेक फ्लॅट्सना टाळे. वीकएन्डला जोडून सुट्टी आली की अर्धीअधिक कॉलनी रिकामी होते. मात्र धुळवडीच्या दिवशी अघोषित संचारबंदी असल्याने जो तो आपापल्या घरात भेटतो. वर्षभरात अखंड दिवस आणि रात्र मिळून सलग २४ तास सर्व कुटुंब घरात राहण्याचे जे काही मोजके दिवस असतात, त्यापैकी एक म्हणजे धुळवड. एरवी आमची कॉलनी म्हणजे पेइंट गेस्ट असल्यासारखी वाटते.
बहुतेकांनी कर्ज घेऊन स्वत:चे घर घेतलंय आणि त्याची परतफेड आता हप्त्याहप्त्याने करताहेत. त्यामुळे काही अपवाद वगळता बहुतेक कुटुंब विभक्त. त्यामुळे पती-पत्नी नोकरीच्या ठिकाणी आणि मुले पाळणाघरात. परिणामी, लाखो रुपयांच्या घरात रविवारचा अपवाद वगळता दिवसभर तसे कुणीच नाही. त्यामुळे बिल्डरांनी सांगितल्याप्रमाणे सोसायटीत कमालीची शांतता मात्र असते. मात्र चाळीत लहानाचे मोठे झालेल्या आम्हासारख्यांना ही शांतता खायला उठते. शांतता काय स्मशानातही असते, पण तिला मंदिरातील नि:शब्दतेची सर नसते. त्यामुळे धुळवडीला सर्व जण घरात असल्याने सोसायटी अगदी भरल्यासारखी वाटते. आता चाळीतल्यासारखे कुणीही कुणाच्याही घरात डोकावत नाही. तो शिष्टपणा आता अंगवळणी पडला आहे. सकाळी मॉर्निग वॉकला जातानाही दुसऱ्या मजल्यावरील जोशीकाकू पहिल्या मजल्यावरील पांडेवहिनींना फोन करतात. दार ठोठावण्याचे कष्ट घेत नाहीत. पूर्वी महिन्याचा मेंटेनन्स देण्याच्या निमित्ताने का होईना सेक्रेटरी आणि सभासदांची भेट होत होती. आता तेही डायरेक्ट बँकेत भरतात. पुन्हा सर्व संवाद ऑनलाइन किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर. त्यामुळे भेटायचे तसे काही कारणच उरलेले नाही. त्यामुळे परवा कोणतेही कारण नसताना गच्चीवरच्या सावलीत मिस्टर अय्यर, जोशीकाका, देशपांडे, दळवी, सावंत आदींच्या मस्त गप्पा रंगल्या. मग खालून कुणाकुणाच्या घरी झालेल्या स्पेशल डिश वर येऊ लागल्या. पत्त्यांचा आणि त्यासोबत गप्पांचा चांगलाच फड रंगला. बऱ्याच दिवसांनी मनसोक्तपणे मेंढीकोट आणि मग रमी खेळलो. मुलांना आदल्या दिवशीच नैसर्गिक रंग आणून दिले होते. त्यामुळे खाली खेळण्यात ती दंग होती. कुणालाही कुठेही जायचे नव्हते. त्यामुळे दुपारी उशिरापर्यंत मस्त धमाल सुरू होती. एरवी दुपारी कधी झोपत नाही. अगदी रविवारीही नाही. कारण तशी सवयच नाही. मात्र जड जेवणामुळे तीननंतर कधीतरी डोळा लागला. जाग आली तेव्हा दिवस मावळू लागला होता. पुन्हा गच्चीवर आलो. तिथे जोशीकाका माझ्याआधी हजर. चहाचा कप हाती घेऊन ते मावळत्या सूर्याकडे टक लावून पाहत होते. मी काहीही न बोलता त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. मला पाहताच म्हणाले, ‘मिस्टर पाटणकर कुणीतरी रंग फेकेल या दहशतीमुळे का होईना, एक संपूर्ण दिवस घरी राहिलो. मात्र ही सक्तीची संचारबंदीही आपण एन्जॉय केली. एरवी सोसायटीच्या मीटिंगमध्ये ठराव करूनही अशा पद्धतीने सर्व कधीही एकत्र आले नसते. धुळवडीच्या निमित्ताने का होईना, कॉलनीत चाळीतल्यासारखे गोकूळ नांदले. जोशीकाकांच्या मताशी मीच काय सर्व मेंबर सहमत आहेत. कुणालाही आपला दिवस वाया गेला असे वाटले नाही.

Story img Loader