ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), महायुतीचे उमदेवार कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र असतानाच, पहिल्याच दिवशी तब्बल २५ उमेदवारांनी ५४ नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत. यात काँग्रेस उमेदवारांचा समावेश असल्याने महाविकास आघडीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या मतदारसंघात उमदेवारांची संख्या जास्त असण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने कपिल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवले आहे. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला गेली असून यामुळे या जागेसाठी आग्रही असलेले काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. यातूनच म्हाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्ते अद्याप उतरलेले नाहीत. काँग्रेसचे काही पदाधिकारी अपक्ष निवडणूक लढाविण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच पहिल्याच दिवशी तब्बल ५४ नामनिर्देशन अर्जाचे वितरण झाले आहे. यामध्ये भाजपा ३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७, धनवान भारत पार्टी १, सायुंकत भारत पक्ष १, न्यू.राष्ट्रीय समाज पार्टी ४, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ५, पिल्पलस पार्टी ऑफ इंडिया ३, राष्ट्रीय किसान पार्टी १, बहुजन समाजवादी पार्टी १, लोकराज्य पार्टी २, अपक्ष २६ नामनिर्देशन अर्जाचा समावेश आहे. यामुळे या मतदारसंघात उमदेवारांची संख्या जास्त असण्याची चिन्हे दिसू लागली आहे. यामध्ये काँग्रेसचे ६ अर्ज असल्याने महाविकास आघाडित बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्रे दाखल झालेले नाही.
हेही वाचा – इंडिकेटर यंत्रणेतील गोंधळामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाहीत. एकूण २५ उमेदवार ५४ अर्ज घेऊन गेले आहेत. पण एकही नामनिर्देशन पत्रे दाखल नाही, अशी माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.