केंद्र आणि राज्य शासनाकडून ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळालेली नसतानाही त्या प्रकल्पाच्या नावाखाली जुन्या ठाण्यातील म्हणजेच, नौपाडा भागातील धोकादायक अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासास पालिकेकडून परवानगी नाकारली जात आहे. या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी लवकरच मेट्रो कार्पोरेशनसह संबंधित विभागांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले असून यामुळे जुन्या ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे शहरातील अंतर्गत सार्वजनिक वाहतूकीसाठी महापालिकेने आखलेल्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. या मेट्रोच्या एकूण २९ किमी मार्गापैकी २६ किलोमीटरचा मार्ग उन्नत तर तीन किमीच्या मार्ग भुयारी करण्यात येणार आहेत. या वर्तुळाकार मार्गावर २० उन्नत आणि २ भुयारी स्थानके उभारण्यात येणार आहेत. जुने ठाणे शहर, वागळे इस्टेट, वर्तकनगर आणि घोडबंदरच्या अंतर्गत भागांतून मार्गाची आखणी करण्यात आली आहे. परंतु या प्रकल्पामुळे जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासात खोडा निर्माण झाल्याने स्थानिक रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या प्रकल्पाच्या भुयारी मार्गिकेमुळे इमारतीच्या बांधकामास परवानगी देता येत नसल्याचे कारण पालिकेकडून दिले जात असून त्याचा फटका नौपाडा तसेच ठाणे स्थानक परिसरातील ५० हून अधिक इमारतींना बसल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस हे एका कार्यक्रमासाठी बुधवारी ठाण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आमदार केळकर यांनी त्यांची भेट घेतली. ठाणे शहरात अंतर्गत मेट्रोमुळे अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात अडथळे निर्माण झाले असून यामुळे या इमारतींमधील नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. यावर तात़डीने तोडगा काढून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असून त्यासाठी पालिका आयुक्त, महामेट्रो काॅर्पोरेशनचे अधिकारी आणि शासनस्तरावर एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी केळकर यांनी यावेळी केली. त्यावर या संदर्भात तोडगा काढण्यासाठी लवकरच मेट्रो कार्पोरेशनसह संबंधित विभागांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती केळकर यांनी दिली.