ठाणे : खरी शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु असतानाच, ठाण्यात आता दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट पुन्हा आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र आहे. ठाण्याच्या तलावपाली भागातील एकाच जागेवर दोन्ही गटाने दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरला असून या दोन्ही गटास महापालिकेनेही परवानगी देऊ केली आहे. परंतु पोलिसांनी मात्र दोन्ही गटांना अद्याप परवानगी दिलेली नसून याच मुद्द्यावरून गेल्या १२ वर्षांपासून आम्हीच दिवाळी पहाटचा कार्यक्रम करत असल्याचे दावे करत दोन्ही गटांनी त्याचठिकाणी कार्यक्रम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दाव्यांमुळे सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्यात आता दिवाळी पहाट कार्यक्रमावरून राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी गोड; कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर..

हेही वाचा >>> कोपरी पूलावर तुळई बसविण्यासाठी एक मार्गिका बंद; ठाण्यात मोठ्या कोंडीची शक्यता

ठाणे शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. नव वर्ष स्वागत यात्रा, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे सण शहरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. याशिवाय, दिवाळी पहाट कार्यक्रमांचेही शहरात ठिकठिकाणी आयोजन करण्यात येते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलाव परिसरात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु याठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटामध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून यामुळे हा कार्यक्रमच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मासुंदा येथील राजवंत ज्वेलर्स समोर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या १० वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेले दोन वर्षे करोना काळात याठिकाणी संस्थेने करोना लसीकरण तसेच इतर उपक्रम राबविले. यंदाही या संस्थेकडून याठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येणार असून ही संस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची आहे. या कार्यक्रमास महापालिकेने व अग्निशमन दलाने यंदा परवानगी दिली आहे. परंतु बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील युवा सेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांनी मात्र हा कार्यक्रम आम्हीच गेली दहा वर्षे करीत असल्याचा दावा करत त्यासाठी पालिकेत परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनीही महापालिकेनेही परवानगी देऊ केली आहे. असे असले तरी पोलिसांनी अद्याप दोन्ही गटांना परवानगी दिलेली नसून याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने गुरुवारी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात शिंदे गटाकडून दुसऱ्या संस्थेला आमच्या अर्जाच्या तारखेच्या मागील तारीख टाकून सत्तेचा दुरुपयोग करून परवानगी दिली आहे, असा आरोप करत शिवसैनिकांवर होणाऱ्या दडपशाहीला आळा घाला, अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दोन्ही गट कार्यक्रम घेण्यावर ठाम असून यामुळेच ठाण्यात आता दिवाळी पहाट कार्यक्रमावरून राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

हेही वाचा >>> बदलापूर : रिक्षा, जीप चालकांच्या बेकायदा थांब्याकडे वाहतूक पोलिसांचा कानाडोळा; वाहनांच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

ठाणे येथील मासुंदा तलाव परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रम युवा सेना करीत आहे. त्यासाठी आम्हीच पालिका आणि पोलिसांकडून परवानगी घेत होतो. यंदाही आम्हीच त्याठिकाणी कार्यक्रम करणार असून त्यासाठी पालिकेने आम्हाला परवानगी दिली आहे. आम्ही महिनाभरापुर्वी परवानगीसाठी अर्ज दिला होता. त्यानुसार आम्हाला परवानगी मिळाली असून त्याप्रमाणे आम्ही शुल्काच्या रक्कमेचाही भारणा केला आहे.

– नितीन लांडगे, बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी

मासुंदा येथील राजवंत ज्वेलर्स समोर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या १० वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेले दोन वर्षे करोना काळात याठिकाणी संस्थेने करोना लसीकरण तसेच इतर उपक्रम राबविले. परंतु याठिकाणी आता शिंदे गटाकडून कार्यक्रम करण्यात अडथळे आणले जात आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रम करायचा असेल तर वागळे किंवा आनंदनगरमध्ये करा. या कार्यक्रमात कशाला अटकाव आणता. एकीकडे हिंदूंचे सण मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करा, असे आवाहन एकनाथ शिंदे हे करतात. पण, दुसरीकडे त्यांच्या ठाण्यात त्यांच्या गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रम करण्यास अटकाव केला जात आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांचे ठाण्यात काय कारनामे सुरु आहेत, त्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष नाही का, त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे.

– राजन विचारे खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signs politics heating diwali event shinde and thackeray group insist diwali morning program at talavpali ysh