ठाणे – गुढीपाडवानिमित्ताने ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह पाहायला मिळाला. ठाण्यातील श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही या यात्रेत शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय विभागातील संस्थांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्ररथ सादर केले. विविध जाती धर्मांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा महाकुंभ यंदाच्या स्वागत यात्रेत दिसून आला. या स्वागत यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षातील नेते सहभागी झाले होते.
श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु मराठी नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात श्रीकौपिनेश्वर मंदिरापासून सकाळी ७ वाजता झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष शरद गांगल, आमदार संजय केळकर, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉ. अश्विनी बापट आणि इतर कार्यकर्ते तसेच काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरातील ६० हून अधिक संस्था सहभागी झाल्या होत्या. यामध्ये समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने गुड अँड बॅड टचचे महत्त्व लहान मुलाना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता. तर, मनशक्ती केंद्राच्या वतीने मुलांना परीक्षेची भीती का वाटते यांसारखे विविध प्रश्न चित्ररथाच्या माध्यमातून मांडले. राजस्थानी, कर्नाटकी, शीख, पारसी, जैन अशा विविध प्रांतातील ठाणेकर नागरिक यंदाच्या यात्रेत सहभागी झालेले दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज, राधाकृष्ण, विठ्ठल, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये लहान मुलं दिसून आली. तर, टीजेएसबी बँकेच्या वतीने बाराखडी आणि मुळाक्षरांचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध दाखविणारा चित्ररथ साकारला होता. घंटाळी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने यंदा चित्ररथ साकारला होता. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये ठाणे, मुंबई सह कल्याण, डोंबिवली यांसारख्या ठिकाणाहून शेकडो सायकल प्रेमी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
पारंपरिक वेषभूषा परिधान करून काही महिला बाईक रॅली मध्ये सहभागी झालेल्या दिसून आल्या. तर, मुख्य चौकात काही सामाजिक संस्थांकडून पालखी आणि रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. तसेच काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थांच्या माध्यमातून मंच उभारले होते. घंटाळी मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या चित्ररथात योगाचे महत्त्व सांगण्यात आले. तर, ठाणे महापालिका शिक्षण, आरोग्य, घनकचरा तसेच पाणीपुरवठा विभागाचे चित्ररथ याठिकाणी पाहायला मिळाले. घनकचरा विभागाच्या चित्ररथात ठाणे शहर स्वच्छ ठेवण्या संदर्भात जनजागृती करणारे गीत सादर केले जात होते. जिल्हा परिषदेचा यंदा पहिल्यांदाच चित्ररथ या यात्रेत सहभागी झाला होता. विविध योजनांची माहिती देणारा हा चित्ररथ होता.
स्वागत यात्रेच्या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चौकाचौकात स्वयंसेवक उभे होते. तसेच काही संस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी पाण्याची तसेच थंडपेय ची व्यवस्था करण्यात आली होती.