एस्टोनिया येथे झालेल्या २३ व्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताला सलग चौथ्यांदा रौप्य पदक मिळाले आहे. अभिषेक डेढे या विद्यार्थ्यांने या पदकाची कमाई केली आहे. गेली आठ वर्षे भारत या आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागी होत असून दरवर्षी वेगवेगळ्या देशात होणाऱ्या या स्पर्धेत भारतातून एक शिक्षक व दोन विद्यार्थी सहभागी होत असतात.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड ऑनलाईन स्पर्धेतून होते. इंडियन फिलोसोफी आलिम्पियाड नावाच्या या स्पर्धेचे संचलन डोंबिवली येथील अभिनव विद्यालयाचे विश्वस्त केदार सोनी यांच्या नेतृत्वाखाली होत असते. केदार सोनी व त्यांचे माजी विद्यार्थ्यांनी यापूर्वी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते या स्पर्धेसाठी नव्या विद्यार्थ्यांची निवड करतात आणि त्यांना प्रशिक्षण देतात. ही स्पर्धा यंदा एस्टोनियाच्या तार्तु येथे १२ व १३ मे रोजी पार पडली. यात ४० देशांमधील ९० स्पर्धक सहभागी झाले होते. यात भारताचे नेतृत्व अभिषेक डेढे (१२ वी, पूणे) व निहार कुलकर्णी (११ वी) या विद्यार्थ्यांनी केले. त्यात अभिषेक डेढे याला रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
भारतीय युवकांना चिकित्सक आणि तर्कशुद्ध विचार करता यावा. त्यातून भारताचा बौद्धिक विकास आणि आर्थिक विकास साध्य होईल. त्यामुळे केदार सोनी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना निरनिराळ्या ४ तत्वज्ञांचे विधान दिले जातात. त्यापैकी एका विधानावर चार तासात एक लेख लिहायचा असतो. निहार व अभिषेक यांची भारतातील सुमारे २५० विद्यार्थ्यांमधून निवड झाली होती. या विद्यार्थ्यांचा ३ महिने ऑनलाईन व २ आठवडे प्रत्यक्ष सराव करुन घेण्यात आला. अभिषेक ने ‘फ्रेगे’ नावाच्या जर्मन तत्वज्ञाचे विचार, आकलन व संवेदन आदि आपल्या लेखात मांडले होते. विचारांना वास्तविकतेची जोड नसल्यास त्यांचे अस्तित्व अर्थपूर्ण असू शकत नाही असे विचार त्याने लेखातून मांडले होते. अभिषेक हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून १२ वी चा अभ्यास करत त्याने या स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला न्यु यॉर्क, रोचेस्टर येथे कोग्नितिव्ह सायन्सची स्कॉरशिप मिळाली असल्याचे सोनी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा