लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर प्रशासनाकडून आक्रमक कारवाई करण्यात येत नसल्याने १००० दिवसांपासून येथील एक सामाजिक कार्यकर्ता प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करत आहे. तसेच एका नागरिकाने याच विषयावरून मुंबईतील आझाद मैदान येथे मागील अकरा दिवसांपासून प्रशासनाच्या विरुद्ध उपोषण सुरू केले आहे. पालिका प्रशासन बेकायदा बांधकामांची पाठराखण करते, असा या नागरिकांचा आरोप आहे.

मागील साडेतीन वर्षापासून डोंबिवलीतील निर्भय बनो संस्थेचे संस्थापक महेश निंबाळकर पालिका प्रशासन बेकायदा बांधकामांच्यावर आक्रमक कारवाई करत नाही म्हणून प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत. आज शुक्रवारी या आंदोलनाला एक हजार दिवस पूर्ण झाले. यानिमित्ताने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निंबाळकर यांनी प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा डोंबिवलीत काढली. यावेळी संस्थेचे अनेक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा… ठाण्यात वाहन थकीत दंड वसुलीसाठी लोकअदालत; दंडाची रक्कम होणार कमी

मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा संकुला समोरील एका अनधिकृत धार्मिक स्थळावर मागील काही वर्षापासून प्रशासन कारवाई करत नाही म्हणून निंबाळकर आंदोलन करत आहेत. यापूर्वी त्यांनी पालिकेत अर्ध नग्न अवस्थेत आंदोलन केले होते. पालिका अधिकाऱ्यांचे आशीर्वादानेच डोंबिवली कल्याण मध्ये बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. हेच अधिकारी भूमाफीयांना पाठबळ देऊन या बेकायदा बांधकामांचे संरक्षण करीत आहेत, असा आरोप निंबाळकर यांनी केला आहे. जोपर्यंत प्रशासन शहरातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करत नाहीत तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

मुंबईत उपोषण

डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखानपाडा हरितपट्ट्यातील एक एकर जमिनीवरील बेकायदा इमारतींवर पालिका कारवाई करत नसल्याने काही वर्ष बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध लढा देणारे डोंबिवलीतील नागरिक विनोद जोशी मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांचा शुक्रवारी उपोषणाचा अकरावा दिवस आहे. जोपर्यंत हरित पट्ट्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जात नाहीत तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहणार आहे असे जोशी यांनी सांगितले. या प्रकरणी जोशी यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडेही तक्रार केली आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

गावदेवी इमारत

डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळील एक बेकायदा इमारत भुईसपाट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. पालिकेने या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू केली होती. आदेश देऊन महिना झाला तरी पालिकेच्या फ प्रभाग कार्यालयाकडून ही इमारत जमीनदोस्त न केल्याने वास्तु विशारद संदीप पाटील यांनी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. ही सात माळ्याची बेकायदा इमारत तोडण्यासाठी प्रशासनाला एवढा वेळ का लागला, असा प्रश्न उपस्थित करून पाटील यांनी भूमाफियांना पाठबळ देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला. आयुक्तांनी याविषयी संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतले. आणि शुक्रवारपासून ही इमारत भुईसपाट करण्याची कारवाई तीव्र केली. सात दिवसात ही इमारत केली जाणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.