सिंगापूर, तालुका मुरबाड, जिल्हा, ठाणे
‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ म्हणतात, तसे ठाणे जिल्ह्य़ातील सिंगापूर गावाचे आहे. आशिया खंडातील एका श्रीमंत राष्ट्राचे नाव धारण करणाऱ्या या आदिवासीबहुल गावातील रहिवासी प्रत्यक्षात दुर्गम भागातील दुर्लक्षित जीवन जगत आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यात एका बिबळ्याने थैमान घातल्याने कुणाच्याही अध्यात मध्यात नसणारे हे मुरबाड तालुक्यातील गाव अचानक प्रकाशझोतात आले..
वाढत्या शहरीकरणाने ठाणे जिल्ह्य़ातील बहुतेक वनक्षेत्र उजाड झाले असले तरी जिल्ह्य़ाच्या सीमांवर अजूनही बऱ्यापैकी हिरवाई टिकून आहे. मुंबई-ठाणे दरम्यान जसे येऊरचे जंगल आहे, तसेच घनदाट जंगल मुरबाड तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमध्ये आहे. याच डोंगररागांमध्ये माळशेज, नाणे आणि दाऱ्या हे तीन प्राचीन घाटमार्ग आहेत. त्यातील माळशेज घाटातून राष्ट्रीय महामार्ग जातो. उर्वरित दोन घाटांमधून मात्र अजूनही पूर्वापार पायवाटा आहेत. ज्या आपल्याला पुणे जिल्ह्य़ात नेऊन सोडतात. नाणेघाटातून जुन्नरला तर दाऱ्याघाटातून आंबवली गावात जाता येते. स्थानिक रहिवासी
तसेच गिर्यारोहक अजूनही या वाटांचा वापर करतात. या डोंगररागांचा अर्धा भाग ठाणे जिल्ह्य़ात तर अर्धा पुणे जिल्ह्य़ात येतो. मात्र हे घाट म्हणजे केवळ दोन जिल्ह्य़ांची हद्द नाही, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचीही सीमारेषा आहे. पुणे जिल्ह्य़ात भीमाशंकरचे निबीड जंगल आहे. त्यामुळे साहजिकच माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांचाही या भागात वावर आहे. गेल्या महिन्यात याच परिसरात बिबळ्याने उच्छाद मांडला होता. त्यामुळे एरवी शांत, कुणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या डोंगराकाठच्या या आदिवासींच्या वस्त्या भलत्याच चर्चेत आल्या होत्या. साधारण एक-दोन किलोमीटर अंतरावर पाच-पंचवीस घरांच्या वाडय़ा वर्षांनुवर्षे शांतपणे जीवन जगत आहेत. त्यांच्या सोबतीला आता शहरवासीयांचे काही ‘सेकंड होम्स’ प्रकल्प आले आहेत. त्यामुळे आठवडय़ाच्या अखेरीस शनिवार-रविवारी येथे शहरवाशांचा राबता वाढला आहे. कोळेवाडी, इष्टेची वाडी, वारूवाडी, ढोबेवाडी, टेंभ्याची वाडी, शेंडय़ाची वाडी, काटेवाडी, सावळावाडी अशी या वस्त्यांची नावे आहेत. या सर्व वाडय़ा मिळून सिंगापूर गाव बनले आहे. विस्तारीकरणामुळे नवे शहर वसल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र नव्या गावांची उदाहरणे तुलनेने कमी आहेत. सिंगापूर त्यापैकी एक. डोंगररागांमध्ये विभागलेल्या आदिवासी वस्त्यांकडे अधिक लक्ष देता यावे, त्यांच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, म्हणून वीस वर्षांपूर्वी पळू गावापासून या वस्त्या वेगळ्या करून सिंगापूर गावाची निर्मिती करण्यात आली. माथेरान अथवा महाबळेश्वरप्रमाणे सिंगापूर हे डोंगरमाथ्यावरचे एक थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गसौंदर्याचे वरदान या परिसराला लाभले आहे. माळशेजला पर्यटकांची गर्दी असते. मात्र त्यातील खरेखुरे निसर्गप्रेमी, गिर्यारोहक वाट वाकडी करून या भागात येतात.
गावात कोळी आणि आदिवासी ठाकूर समाजाचे लोक राहतात. पारंपरिक शेती आणि शेळ्या-मेंढय़ापालन हे या रहिवाशांचे उपजिविकेचे साधन आहे. सेकंड होम्समुळे आता अनेक स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे. चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरबाडहून ठरावीक वेळी येणारी एस.टी. हे एकमेव दळणवळणाचे साधन आहे. प्राथमिक शिक्षणाची सोय गावपाडय़ांवर आहे. पुढील शिक्षणासाठी मात्र येथील रहिवाशांना पळू, टोकावडे, सरळगांव अथवा शिवळे या मोठय़ा गावांमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये यावे लागते. शासनाचे नव्याने हाती घेतलेल्या ‘इको टुरिझम’ प्रकल्पासाठी हा आदर्श परिसर आहे. मात्र या भागात सेकंड होम्स प्रकल्पांना मान्यता देताना त्यामुळे येथील शांतता तसेच निसर्गसौंदर्य धोक्यात तर येणार नाही ना, याची काळजी घेतली जावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
शोध मोहिमेचा बेसकॅम्प
सिंगापूरच्या कोळेवाडीत शिरले की समोर क्षितिजावर नाणे आणि दाऱ्या या दोन घाटांचे सुळके डोक्यावर मुकुट असल्याप्रमाणे दिसतात. हजारएक लोकवस्ती असणारी ही सिंगापूरमधील सर्वात मोठी वस्ती आहे. याच वस्तीतून बिबळ्याला शोधण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली होती. जवळपास पंधराएक दिवस बिबळ्या सर्वाना हुलकावणी देत होता. या ठिकाणी मोबाइलची रेंज मिळत नसल्याने आम्ही येथे बेसकॅम्प उभारला होता, अशी माहिती टोकावडे विभागातील वनरक्षक सुनील पांडोळे यांनी दिली. बिबळ्याला पकडण्यासाठी याच गावाच्या वाटेवर सापळे लावण्यात आले होते.
बिबळ्याचे वर्तन आश्चर्यकारक
या परिसरात बिबळ्यांचा वावर पूर्वापार आहे. आमच्यापैकी अनेकांनी डोंगर भागात, जंगलात बिबळ्यांना पाहिले आहे. मात्र त्यांची आम्हाला कधी भीती वाटली नाही. कारण वाडी वस्तीतील माणसांवर, पाळीव प्राण्यांवर कधी बिबळ्याने हल्ला केल्याचे आठवत नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बिबळ्याने हल्लासत्र सुरू केल्याने आश्चर्य वाटले, असे नाना सदु पिचड यांनी सांगितले. मात्र गेल्या महिन्यातील प्रकारानंतर लोकांनी आता काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. रात्री-अपरात्री एकटे घराबाहेर पडणे टाळा असे लोकांना सांगण्यात आले आहे.
निसर्गसौंदर्याची श्रीमंती
कोकण किनारपट्टीच्या सीमारेषेवरील या प्रदेशाला निसर्गसौंदर्याचे मात्र वरदान लाभले आहे. दाऱ्या घाटाच्या माथ्यावरील डोंगररागांमध्ये उगम पावणारी कनकवीरा नदी नागमोडी वळणे घेत या भागातून वाहते. याच डोंगररांगांमध्ये बारमाही वाहणारे जिवंत जलस्रोत आहेत. त्यातील काही झऱ्यांवर योजना राबवून ते पाणी खालच्या आदिवासी वस्त्यांना नळाद्वारे पुरविण्यात आले आहे.