प्रेम हे जगातील एक सत्य आहे. ज्ञानेश्वरांनीदेखील पसायदानातून अवघ्या विश्वावर प्रेम करा असा सल्ला दिला आहे. याच प्रेम विषयावर अनेक कवींनी आपल्या भावना शब्दांतून व्यक्त केल्या आहेत. ‘तिने प्रेम केले किंवा त्याने प्रेम केले तर करू देत की, मला सांगा तुमचे काय गेले’ असे सांगणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर असतील किंवा ‘उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं’ म्हणणारे कुसुमाग्रज असतील यांनी प्रेमाची व्याख्या अगदी अचूक लिहून ठेवली आहे असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही. याचाच प्रत्यय रविवारी सकाळी गडकरी रंगायतन येथे ठाणेकर रसिकांनी घेतला. अत्रे कट्टय़ातर्फे आयोजित केल्या गेलेल्या ‘हृदयी प्रीत जागते’ या कार्यक्रमात गायिका अनुजा वर्तक यांनी आपल्या आवाजातून रसिकांची मने रिझवली.
शब्द आणि सुरांची एक घट्ट वीण तयार होते. आभाळाची शोभा जसे इंद्रधनुष्य वाढवते तशीच शब्द आणि सुरांची शोभा गायक आणि गायिका वाढवीत असतात. रविवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक कुटुंब दिनाचे औचित्य साधून प्रत्येक नात्यातील प्रेमाची कल्पना ही वेगळी असते, याचे उदाहरण स्वर, शब्द आणि आवाजातून रसिकांपर्यंत पोहोचत होते. कार्यक्रमाची सुरुवातच नीलेश निरगुडकर यांनी ‘या जन्मावर या जागण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याने केली. त्यानंतर कार्यक्रमाचे शीर्षकगीत म्हणजे ‘हृदयी प्रीत जागते जाणता नजाणता’ हे गाणे गायल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील आचार्य अत्रे यांचे आवडीचे ‘मजवरी तयाचे प्रेम खरे’ हे पद कश्मीरा राईलकर यांनी आपल्या सुंदर आवाजात सादर केले. सासू आणि सुनेचे नाते आता बदलले असल्याचे दीपाली यांनी नमूद करताच अनुजा वर्तक यांनी ‘मुली तू आलीस आपल्या घरी’ हे गाणे सादर केले.
प्रेम ही अतिशय अलगद भावना आहे. ही भावना जेव्हा आईच्या प्रेमापोटी बाहेर येते तेव्हा माधव ज्युलियनसारखे कवी घडतात. त्यामुळे आई-मुलाच्या प्रेमभावनेचे वर्णन करताना ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई बोलावू तुझं आता मी कोणत्या उपायी’ हे गीत अनुजा वर्तक यांनी सादर केले. तर कश्मीरा राईलकर आणि नीलेश निरगुडकर यांनी ‘धुंदीत राहू मस्तीत गाऊ’ हे गाणे सादर केले. या वेळी दीपाली केळकर यांनी निवेदन करताना एक उखाणा घ्यावा आणि त्यात आपल्या यजमानांचे नाव घ्यावे अशी विनंती अनुजा वर्तक यांनी प्रेक्षकांच्या वतीने त्यांना केली, आणि त्यांनी ती पूर्णही केली.
बहीण -भावाच्या नात्याच्या प्रेमाचं उदाहरण देऊन नीलेश आणि कश्मीराने ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ हे गीत सादर केले. रसिकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे ऐकवावे यासाठी अनुजा वर्तक यांनी गायलेलं आणि विजया वाड यांनी शब्दबद्ध केलेलं ‘काय सांगू शेणी बाई माझा माहेरचा थाट’ हे गाणे सादर केले. ‘राधा कृष्णावर भाळली’ हे गाणे कश्मीराने सादर केल्यानंतर अनुजा वर्तक यांनी ‘ऐन दुपारी यमुना तीरी खोडी कुणी काढली’ या गाण्याचे सादरकीरण केले. या गाण्याला मयूरेश शेर्लेकर यांनी ढोलकी वाजवून गाण्याची रंगत वाढवली. कीबोर्डवर साथ देणारा सागर टेमघरे, तबला अजय दामले, संवादिनी अनंत शेवडे आदी वादकांनी आपल्या वादनातून गाण्याची गंमत वाढवली. उपस्थित रसिकांनी प्रत्येक गाण्याला मनापासून दाद दिली.

Story img Loader