डोंबिवली – डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणी मागील काही महिन्यांपासून थंडावलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथक (एसआयटी) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या तपासाने पुन्हा वेग घेतला आहे. आता या प्रकरणातील जमीनदार, विकासक, वास्तुविशारद, भागीदार यांना ‘एसआयटी’ने पुन्हा चौकशीचा भाग म्हणून बोलविण्यास सुरुवात केल्याने अनेक महिने निवांत असलेले भूमाफिया अस्वस्थ झाले आहेत. तसेच, ईडीने ६५ प्रकरणांसह पालिकेकडून ‘एमआरटीची’पा गुन्हा दाखल असलेल्या, संशयास्पद व्यवहार करणाऱ्या भूमाफियांच्या बँक खात्यांवर नजर ठेवली आहे. याप्रकरणात डोंबिवलीतील काही माफियांना आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद दाखल करण्याच्या सूचना ईडीने काही भूमाफियांना दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.
डोंबिवलीत बनावट बांधकाम कागदपत्रांच्या आधारे ६५ बेकायदा इमारती उभ्या करून माफियांनी त्या कागदपत्रांच्या आधारे महारेराकडून नोंदणी क्रमांक मिळविला. हे प्रकरण वास्तुविशारद संदीप पाटील यांनी उघडकीला आणले. डोंबिवलीत बेकायदा इमारती उभारताना माफियांनी पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा अधिभार, वस्तु आणि सेवा कर, प्राप्तिकर, शासनाचा महसूल चुकविला आहे. या बेकायदा उभारणीसाठी माफियांनी कोणत्या माध्यमातून पैसा उभा केला आणि तो कोठे जिरविला याचा तपास ईडी अधिकाऱ्यांना करायचा असल्याने पुन्हा आपली तपास चक्रे गतिमानतने हलविण्यास सुरुवात केल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले.
राजकीय दबावामुळे तपास यंत्रणांना काम करताना अडथळे येत असल्याने नव्याने सुरू चौकशी प्रकरणाचा गाजावाजा होणार नाही याची दक्षता दोन्ही यंत्रणांची तपास पथके घेत असल्याचे कळते. तपास पथकाने डोंबिवलीतून मागील आठवड्यात पाच ते सहा मातब्बर माफियांना तपासासाठी उचलल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले. ६५ बेकायदा इमारत प्रकरणातील जमीनदार, बांधकामधारक यांची नव्याने चौकशी करण्याच्या हालचाली तपास पथकाने सुरू केल्या आहेत. यामधील काही माफियांनी यापूर्वी तपास पथकाने आपले म्हणणे मांडले आहे. हे प्रकरण तडीस नेणे आवश्यक असल्याने तपास पथकाने या प्रकरणाच्या नस्तीवरील धूळ झटकून नव्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
‘एसआयटी’कडून पुन्हा बोलविणे येऊ लागल्याने अनेक दिवस निवांत असलेले भूमाफिया पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. ईडीनेही अनेक माफियांच्या बेनामी व्यवहारांवर करडी नजर ठेवल्याचे सुत्रांकडून समजते. डोंबिवलीत पोलिसांची एसआयटी, ईडीकडून बेकायदा बांधकामांचा तपास सुरू असताना भूमाफिया मात्र बेकायदा बांधकामे उभारणे थांबवत नसल्याने कल्याण, डोंबिवलीत प्रशासन नावाची यंत्रणा आहे की नाही असे प्रश्न नागरिक करत आहेत. बेसुमार बेकायदा चाळी, इमारतीची बांधकामे डोंबिवली शहराच्या विविध भागांत सुरू आहेत. या बांधकामांवर प्रभागातील साहाय्यक आयुक्त माफियांबरोबर संगनमत करून दिखाव्याची कारवाई करतात. त्यामुळे माफियांना बांधकामे करण्यासाठी बळ मिळत असल्याचे जाणकार नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा – ठाण्यात १७० एकरवर समूह विकास योजना राबविणे अशक्य – आव्हाड
एसआयटी, ईडीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे असे सांगून अधिक बोलणे टाळले. विश्वसनीय सुत्राने मात्र ६५ बेकायदा इमारत प्रकरण आणि इतर बेकायदा प्रकरणांचा तपास यंत्रणांनी बारकाईने सुरू केला आहे. ६५ बेकायदा प्रकरणांसह बेकायदा इमारतींची दस्त नोंदणी करणारा कल्याणमधील एक सहदुय्यम निबंधक जी. बी. सातदिवे चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.