लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूर : अंबरनाथ पूर्वेत बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या सिताई सदर या घरावर झालेल्या गोळीबारानंतर पनवेलकर यांनी थेट किसन कथोरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी विशेष तपास समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी अनेक गंभीर आरोपही केले आहेत.
अंबरनाथ येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांचे निवासस्थान पूर्वेतील हुतात्मा चौकाजवळ आहे. या घरावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाता अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र या प्रकरणात विश्वनाथ पनवेलकर यांच्या विधानांमुळे वेगळे वळण मिळाले.
पनवेलकर यांनी माध्यमांशी बोलताना या हल्ल्यात बदलापुरचे आमदार किसन कथोरे यांच्यावर संशय घेतला. तसेच आमदार किसन कथोरे आपल्याला उद्योग – व्यवसायात विविध माध्यमातून अडचणी निर्माण करत असल्याचाही आरोप केली होता. या आरोपांनंतर आमदार किसन कथोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. कथोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच याप्रकरणी आपण मानहानीचा खटलाही दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर आता आमदार किसन कथोरे यांनी थेट राज्याचे मु्खमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी विशेष तपास समितीची स्थापना करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.पनवेलकर यांनी केलेल्या आरोपांमुळे माझ्या स्वच्छ प्रतिमेला तडा बसला. तसेच माझ्या राजकीय प्रतिष्ठा मलीन करण्याचा जाणुन बुजून हेतूपुरस्कर प्रयत्न करीत आहे, असे कथोरे यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणी १०० कोटींचा मानहानीचा खटलाही दाखल करणार असल्याची माहिती कथोरे यांनी दिली आहे.
म्हणून आरोप
आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या पत्रात विश्वनाथ पनवेलकर यांच्यावर आरोप केले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे अनेक तकारी विश्वनाथ पनवेकर यांच्याविषयी आल्या. त्याकामी नागरिकांना मदत करणे आमदार या नात्याने माझे कर्तव्य असल्याने मी त्यांना मार्गदर्शन केले, असे कथोरे यांनी पत्रात म्हटले आहे. तर नागरिकांच्या प्रत्येक तकारी आणि समस्यांविषयी त्यांची मदत करून त्यांना न्याय देणे ही माझी जबाबदारी आहे, असेही कथोरे पत्रात म्हणाले आहेत. तर त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यांचे नावही अनेकदा आरोपी म्हणून होते. आमदार असल्याने त्यातून ते बाहेर सुटले, असा आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी केला आहे.