कल्याण – डोंबिवलीतील ६५ महारेरा घोटाळ्यातील एकाही बेकायदा इमारतीमधील सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या दस्तांची नोंदणी करू नका, असे आदेश ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मागील वर्षी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांबरोबर कल्याण, डोंबिवलीतील सह दुय्यम निबंधक कार्यालयांना दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून महारेरा घोटाळ्यातील इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी करणाऱ्या कल्याणमधील एका सह दुय्यम निबंधकाला विशेष तपास पथकाने नोटीस बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवलीत गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या घेऊन या कागदपत्रांना ‘महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणा’ची (महारेरा) बनावट नोंदणी प्रमाणपत्र जोडून घरे विकली जात असल्याचा प्रकार वास्तुविशारद संदीप पाटील यांनी उघडकीला आणला. या घोटाळ्याप्रकरणी वास्तुविशारद पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यावर पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६५ भूमाफियांविरुद्ध फौजदारी गुन्हे रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केले.
याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष तपास पथक करत आहे. ६५ बेकायदा इमारती पालिकेच्या आरक्षित भूखंड, सरकारी जमिनींवर उभारल्या आहेत. अतिशय निकृष्ट पद्धतीने उभारलेल्या या इमारती धोकादायक असल्याचा निष्कर्ष तपास पथकाने काढला आहे. या बेकायदा इमारतींमधील घरे भूमाफिया घर खरेदीदारांना २५ लाखांपासून ते ३५ लाखापर्यंत दस्त नोंदणी पद्धतीने विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर तपास पथकाने राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक, कोकण विभागाचे उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना ६५ बेकायदा इमारतींचा सर्व्हे क्रमांक, जमीन मालक, विकासक, वास्तुविशारदांच्या माहितीचा अहवाल पाठविला. या अहवालातील एकाही बेकायदा इमारतीमधील सदनिका, गाळ्यांच्या खरेदी, विक्रीची दस्त नोंदणी करू नये, असे कळविले होते.

हेही वाचा – कोपर रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला

या आदेशानंतर वरिष्ठांच्या आदेशावरून कल्याण डोंबिवलीतील एक ते पाच सह दुय्यम निबंधक कार्यालयांनी ६५ बेकायदा, २७ गावमधील बेकायदा इमारतींची दस्त नोंदणी बंद केली होती. परंतु, कल्याण पश्चिमेतील चिकणघरमधील होली क्राॅस शाळेजवळील सह दुय्यम निबंधक-२ कार्यालयातील सह दुय्यम निबंधक जी. बी. सातदिवे महारेरा घोटाळ्यातील इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी करत असल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवड्यात उघडकीस आणला होता. याशिवाय, २७ गावांमधील, महारेरा घोटाळ्याव्यतिरिक्त इतर बेकायदा इमारतींची दस्त नोंदणी सह दुय्यम निबंधक सातदिवे करत असल्याच्या तक्रारी आहेत.

गंभीर दखल

‘लोकसत्ता’मधील वृत्ताची गंभीर दखल घेऊन विशेष तपास पथकाने सह दुय्यम निबंधक जी. बी. सातदिवे यांना चौकशीची नोटीस पाठवून त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे सुत्राने सांगितले. सातदिवे तपास पथकासमोर हजर झाल्यानंतर त्यांना प्रतिबंध असताना महारेरा घोटाळ्यातील सदनिकांनी दस्त नोंदणी केली आहे का. किती दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती मागविण्यात आल्याचे कळते. आपणास कोणी काही करू शकत नाही या अविर्भावात असलेल्या सातदिवे यांची तपास पथकाच्या नोटिशीने भंबेरी उडाली आहे. आपण असे काही केले नाही, असे उत्तर सातदिवे यांनी यापूर्वी दिले आहे. तर दस्त नोंदणीत गैरप्रकार केल्याची तक्रार प्राप्त झाली तर कारवाई केली जाईल, असा इशारा मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण राजपूत यांनी दिला आहे. सातदिवे यांना संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तपास पथकाच्या आदेशाचे आणि नोंदणी महानिरीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने सह दुय्यम निबंधक सातदिवे दुहेरी कारवाईत सापडू शकतात, अशी माहिती मुद्रांक विभागातील एका वरिष्ठाने दिली.

हेही वाचा – ठाण्यातील सेवा रस्त्यांवर वाहनतळाची सुविधा सुरू

“प्राप्त माहितीप्रमाणे डोंबिवलीतील ६५ इमारत प्रकरणातील सदनिकांची दस्त नोंदणी केली आहे किंवा कसे याविषयी सविस्तर माहिती देण्याचे आदेश सह दुय्यम निबंधक सातदिवे यांना दिले आहेत.” असे ठाणे, साहाय्यक पोलीस आयुक्त व तपास पथक प्रमुख, इंद्रजित कार्ले म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sit notice to sub registrar in kalyan and registration of flats in maharera scam in dombivli ssb