गायमुख रस्त्यावर १२ दिवसांत सहा अपघात
किशोर कोकणे, ठाणे</strong>
घोडबंदर येथील गायमुख भागातील एका धोकादायक वळणावर १२ दिवसांत तब्बल सहा भीषण अपघात झाले आहेत. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्तारुंदीकरणाची गरज आहे, असे रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागेवर मोठय़ा प्रमाणात खारफुटी असून ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे रुंदीकरणात व पर्यायाने अपघात रोखण्यात अडथळे येत आहेत.
ठाण्याहून गुजरात किंवा बोरिवलीच्या दिशेने जाणारी हजारो वाहने घोडबंदर रस्त्यावरून मार्गक्रमण करतात. गायमुख येथील जकात नाका परिसरातील अरुंद आणि उतरणीचा भाग गेल्या काही वर्षांपासून अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. अवघ्या १२ दिवसांत या मार्गावर अवजड वाहनांचे तब्बल सहा गंभीर अपघात झाले आहेत. यात एका २३ वर्षीय टँकरचालकाचा मृत्यूही झाला. स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर एमएसआरडीसीने या ठिकाणी काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरीही अपघात होत आहेत.
अपघात रोखण्यासाठी एमएसआरडीसीला कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या आहेत. वळणाच्या बाजूला असलेली जमीन वन विभागाची आहे. खाडीकिनारी भाग असल्याने येथे मोठय़ा प्रमाणात खारफुटीही आहे. त्यामुळे या भागात रस्ता रुंदीकरण करणे एमएसआरडीसीला शक्य नाही. खारफुटीवर भराव टाकण्यासाठी दिल्लीतून परवानगी मिळवावी लागते. त्यामुळे ही परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याचे वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
नेमके काय होते आहे..
* गायमुख जकात नाका येथे मोठे वळण आहे. त्यामुळे घोडबंदरहून वेगाने ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने थेट खाडीच्या दिशेने जातात. कंटेनरच्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. या अपघातांत मृतांची संख्या कमी असली तरी अपघात गंभीर स्वरूपाचे असतात.
* अपघात झाल्यास वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आम्ही एमएसआरडीसीशी तीन ते चार वेळा पत्रव्यवहारही केला आहे, असे कासारवडवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.
* आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वन विभागाकडे २०१७ पासून पाठपुरावा करत आहोत. यंदा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत वन विभागाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
* वन विभागाची परवानगी मिळाली की रस्ता रुंद करून ज्या भागात रस्ता जास्त उंच आहे त्या भागातील उंची १४ ते १५ फूट कमी करण्यात येईल. त्यामुळे रस्ता समतल होऊन अपघात रोखण्यास मदत होईल.
अपघाताच्या घटना
१ एप्रिल -ठाण्याच्या दिशेने येणारा टँकर उलटला. जीवितहानी नाही.
३० मार्च – ठाण्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा कंटेनर उलटला. जीवितहानी नाही.
२४ मार्च- ठाण्याच्या दिशेने येणारा ट्रक उलटला. चालकाच्या सहकाऱ्याला दुखापत.
२३ मार्च- ठाण्याच्या दिशेने येणारा कंटेनर उलटला. वाहनचालक किरकोळ जखमी.
२२ मार्च – गुजरातहून ठाण्याकडे येणाऱ्या एका कंटेनरमधील पत्र्याचे रोल रस्त्यावर पडले. मागून येणाऱ्या दूधटँकरच्या चालकाला ते दिसले नाहीत. त्यामुळे दुधाचा टँकर थेट त्या पत्र्यांवर आदळून उलटला. टँकरचालकाचे सहकारी दुर्गेश गुजर (२३) यांचा मृत्यू.
२० मार्च- गुजरातहून आलेल्या एका कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकावर आदळला. जीवितहानी नाही.