कल्याण – दुहेरी हत्येचा आरोप असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सहा जणांची ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रेमळ विठ्ठलानी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मृत्यू झालेल्यांमध्ये एका पोलिसाचाही समावेश होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना काही त्रृटी ठेवल्या, सबळ पुरावे हाती न ठेवता या गुन्ह्याचा तपास केला. सबळ पुरावे हाती नसताना आरोपींवर हत्येचा आरोप ठेवला. त्यामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेवर ठपका ठेवत न्यायाधीशांनी सहा जणांची हत्येच्या आरोपातून मुक्तता केली. संजय पाटील, एलीएन फर्नांडिस, महेंद्र सावंत, मलीन फर्नांडिस, हरीदास भोईर, जोसेफ फर्नांडिस अशी सुटका झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. यामधील काही जण इस्टेट एजंट, सुतार, वाद्यवादक, खासगी पाणी पुरवठादार आहेत. पोलिसांनी सुरुवातीला हा अपघात असल्याची नोंद घेतली. त्यानंतर हा खून असल्याचा संशय घेऊन तपास केला होता.
पोलीस शिपाई अनिल बाबर (३४), नारायण पाटील (२१) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. वाडा भागातील रस्त्यावर हे दोघे जण मरण पावले होते. या दोघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. ऑक्टोबर २०१२ मध्ये हा अपघात घडला होता. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील ॲड. संजय मोरे यांनी सरकार पक्षाची बाजू न्यायालयात मांडली. आरोपींतर्फे ॲड. गजानन चव्हाण, ॲड. भरत सोनावणे आणि ॲड. रामराव जगताप यांनी बाजू मांडली. आरोपींनी दोन जणांची हत्या केल्याची माहिती सरकार पक्षातर्फे न्यायालयात देण्यात आली. परंतु, आरोपीच्या वकिलांनी सबळ पुराव्याने सरकार पक्षाची बाजू खोडून काढली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सबळ पुरावे दाखल न केल्याने पोलिसांच्या तपासावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत या प्रकरणातील सहा जणांची निर्दोष मुक्तता केली.