चेकमेट कंपनी दरोडाप्रकरणी सहा जणांना अटक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील चेकमेट कंपनीतील कर्मचारी अमोल कर्ले याला दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखविला आणि पैशांनी भरलेले पिंप  त्याला गाडीत ठेवण्यासाठी तीनदा कंपनीबाहेर नेले. या तिन्ही वेळेस उंच-धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या अमोलने एकदाही दरोडेखोरांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याच चौकशीत दरोडय़ाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आणि त्यानंतर दरोडय़ाच्या गुन्ह्य़ाचा सविस्तर उलगडा होत गेला.

ठाणे येथील लोकमान्यनगर भागात आकाश चंद्रकांत चव्हाण ऊर्फ चिंग्या राहतो. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात तो चेकमेट कंपनीत नोकरीला लागला होता. त्याला रात्रपाळीची डय़ुटी देण्यात आली होती, मात्र त्याला दिवसपाळीची डय़ुटी हवी होती. याच कारणावरून त्याचे कंपनीच्या व्यवस्थापकासोबत वाद झाले आणि त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले. तेव्हापासून तो कुठेच नोकरी करीत नव्हता. झटपट पैसा कमवून मोठे व्हायचे, असे त्याचे स्वप्न होते. यातूनच चेकमेट कंपनीत दरोडा टाकण्याची योजना त्याच्या डोक्यात आली.

परंतु नोकरी सोडल्यामुळे कंपनीच्या सुरक्षेविषयी त्याच्याकडे काहीच माहिती नव्हती. ही सर्व माहिती मिळावी आणि दरोडा यशस्वी व्हावा, यासाठी त्याने अमोल कर्ले याला चेकमेट कंपनीत नोकरीला लावले. तेव्हापासून अमोल त्याला कंपनीतील सर्व माहिती पुरवीत होता. कंपनीतील रोकड लुटण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे त्याने उमेश वाघची मदत घेतली.

उमेशच्या नावावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्यामुळेच आकाशने दरोडय़ासाठी त्याची मदत घ्यायचे ठरविले. आकाशची योजना ऐकून उमेश लगेच तयार झाला. कंपनीत दरोडा कसा टाकायचा, याचे नियोजन दोन महिन्यांपूर्वी त्याने आखले. ठरल्याप्रमाणे मंगळवारी पहाटे तीन वाहनांमधून सर्व जण माजिवाडा भागात आले. तिथेच आकाश आणि उमेश या दोघांनी दरोडा कसा टाकायचा, याची योजना अन्य साथीदारांना सांगितली. त्यानुसार सर्व जण मनोरुग्णालयाजवळ आले आणि त्यापैकी चौघे कंपनीत शिरले. त्यानंतर सगळ्यांनी दरोडा टाकत नाशिकच्या दिशेने पलायन केले.

मोबाइलमुळे धागेदोरे उलगडले..

दरोडा टाकण्यापूर्वी सर्वानी मोबाइल बंद केले होते, मात्र दरोडय़ानंतर काही जणांनी मोबाइल चालू केले होते. तपासादरम्यान आरोपींचे मोबाइल क्रमांक पोलिसांच्या हाती लागले होते. यापैकी काही मोबाइलचे शेवटचे लोकेशन नाशिकजवळील घोटी येथील होते. तसेच दरोडय़ादरम्यान कंपनीतून कामगारांचे पाच मोबाइल चोरून नेण्यात आले होते. त्यापैकी काही मोबाइलचे लोकेशन माणकोली दाखवत होते. त्यामुळे दरोडेखोर नाशिकच्या दिशेने पळून गेल्याचा अंदाज बांधत पोलिसांनी नाशिकच्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली.

अवघ्या ४८ तासांत गुन्हा उघडकीस

  • चेकमेट कंपनीतील दरोडय़ाचा गुन्हा ठाणे पोलिसांनी अवघ्या ४८ तासात उघडकीस आणत टोळीच्या म्होरक्यासह सहा जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत चार कोटी १२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आणखी १५ आरोपी फरारी असून त्यांचाही शोध सुरू आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशातून हा दरोडा टाकण्यात आला आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी दिली.
  • नीतेश आव्हाड (२२), अमोल कर्ले (२६), आकाश चव्हाण , मयूर कदम (२१), उमेश वाघ (२८) आणि हरिश्चंद्र मते (३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोणतेही धागेदोरे हाती नसतानाही ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे खंडणीविरोधी पथकाने आरोपींना शोधून काढले, असेही आयुक्त सिंग यांनी सांगितले. दरोडय़ानंतर हे सर्व जण नाशिकजीकच्या वाडिवऱ्हे गावातील एका शेतामध्ये गेले. तिथेच त्यांनी पैशांचे वाटप केले. मुख्य आरोपींनी स्वत: कडे जास्त पैसे ठेवले तर उर्वरित प्रत्येकाला त्यांच्या सहभागाप्रमाणे पैसे देण्यात आले.

इफेड्रिनप्रकरणी तिघे लक्ष्य

मुंबई : इफेड्रिनच्या साठेबाजी प्रकरणात बॉलीवूडचा एक अभिनेता, टीव्हीवरील एक अभिनेत्री आणि दोन इतर नट ठाणे पोलिसांच्या रडारवर आहेत. यापैकी अभिनेत्याने १९८० च्या दशकात काही गल्लाभरू चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना १७ एप्रिल रोजी २० टन इफेड्रिनचा साठा सापडला होता. पाटर्य़ामध्ये वापरला जाणारा ‘मिथॅमफेटामाइन’ किंवा मर्थ हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी तो आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यात येणार होता अशी शंका आहे.

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six arrested in checkmate company robbery case