डोंबिवली : येथील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत भारतात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे आढळून आले नाहीत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दोन दिवसापूर्वी कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडी भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी पती, पत्नीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ते मागील सात वर्षापासून कल्याणमध्ये राहत होते. पती एका वाहनावर चालक, तर पत्नी एका हाॅटेलमध्ये सेविका म्हणून काम करत होती.
हेही वाचा : Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!
मानपाडा पोलिसांना आपल्या पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खात्री केल्यावर त्यांना सहा बांगलादेशी राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या सहा बांगलादेशींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठीचे पारपत्र, व्हिसा आणि नागरिकत्व कागदपत्रांची मागणी केली असता पोलिसांना ते एकही कागदपत्र देऊ शकले नाहीत. बिसू शेख, रुमान पोकीर, दिलावर हुसेन, आरीफ मुल्ला, आरीफ मोफिजून, एक अज्ञात महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या सहा जणांविरुध्द कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
© The Indian Express (P) Ltd