कल्याण: पहलगाम येथील बेसरन पठारावरील दहशतवादी हल्ल्यानंतर कल्याण, डोंबिवलीतील पोलिसांनी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून कल्याण, डोंबिवली परिसरात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांविरुध्द शोध मोहीम सुरू केली आहे. या शोध मोहिमेत मागील दोन दिवसांमध्ये पोलिसांनी कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांमधून एकूण सहा बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे.

त्यांच्या विरुध्द कल्याणमधील महात्मा फुले पोलीस, खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ आणि डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात भारतात प्रवेशाचे पारपत्र अधिनियम आणि विदेशी नागरिक कायद्याने गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात भारतीय व्हिजावर एकही पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. उल्हासनगर शहरात एकूण ११ नागरिक भारतीय व्हिजावर वास्तव्य करत होते. हे नागरिक सिंधी समाजातील होते.

महाराष्ट्र सरकारने त्यांना देश सोडण्याचे आदेश दिल्याने ही मंडळी दोन दिवसापूर्वीच पाकिस्तानमध्ये परतली आहेत. स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शोध पथकांनी आपल्या हद्दीत बांग्लादेशी नागरिक चोरून लपून राहतात का याचा तपास करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त झेंडे यांनी दिले आहेत. कल्याण, डोंबिवली शहरात शोध घेत असताना शोध पथकाच्या पोलिसांना काही झोपडपट्ट्या, चाळींमध्ये बांग्लादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्या नागरिकांना नोटिसा देऊन स्थानकि पोलीस ठाण्यात आपली वास्तव्याची आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका आणि इतर कागदपत्रे घेऊन बोलविले. या नागरिकांच्या महाराष्ट्रातील वास्तव्याची माहिती तपासात असताना या नागरिकांकडे भारतात, महाराष्ट्रात राहण्यासाठीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी या सहा बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले. हे बहुतांशी बांग्लादेशी चालक, मजुरी, हाॅटेलमध्ये सेवक, गॅरेजमध्ये काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या चार महिन्याच्या काळात कल्याण पोलीस परिमंडळातून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून कल्याण, डोंबिवली शहर परिसरात राहत असलेल्या ३८ बांग्लादेशी नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

कल्याण, डोंबिवली परिसरात एकही बांग्लादेशी बेकायदेशीरित्या राहणार नाही यासाठी मागील चार महिन्यांपासून गुन्हे शाखा, शोध पथकाचे पोलीस तपास करत आहेत. मागील चार महिन्यात ३८ बांग्लादेशींवर गुन्हे दाखल केेल आहेत. नव्याने सहा बांग्लादेशी ताब्यात घेण्यात आले आहेत. ही तपास मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. – अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त,कल्याण.