२७ गावांतील बेकायदा बांधकामे पुन्हा पालिकेच्या रडारवर

डोंबिवली : २७ गावांमधील भोपर येथे ‘ई’ प्रभागाच्या हद्दीत दोन विकासकांनी उभारलेल्या सहा बेकायदा इमारती मानपाडा पोलीस आणि प्रभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे पालिकेने पुन्हा २७ गावांतील बेकायदा बांधकामांकडे मोर्चा वळवला आहे.

पालिकेचा ‘बाह्य़ वळण’ रस्ता प्रस्तावित असलेल्या परिसरात मदन गुप्ता आणि रतिलाल गुप्ता यांनी सहा बेकायदा इमारती उभारल्याच्या तक्रारी अतिक्रमण नियंत्रण विभागाकडे आल्या होत्या. या बांधकामांची खात्री झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने ई प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड यांना कारवाईचे आदेश दिले. चार जेसीबी, एक पोकलेन आणि कामगारांच्या साहाय्याने ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पायाचे कामही उद्ध्वस्त करण्यात आले.

ही बांधकामे पाडण्यासाठी ई प्रभागाचे अधिकारी गतवर्षीच गेले होते, मात्र एका उच्चपदस्थ वादग्रस्त लाचखोर निलंबित अधिकाऱ्याच्या आणि एका राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारवाई न करता परतावे लागले होते. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी कोणतेही कारण न देता पालिकेला बंदोबस्त देण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी कारवाईच्या वेळी उपस्थित राहत आहेत. २७ गावांतील बहुतेक बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. टप्प्याटप्प्याने ही सर्व बेकायदा बांधकामे तोडण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

 

 

Story img Loader