लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: येथील पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ला रेतीबंदर भागातून दुचाकी मधून सहा किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ८० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
करीम उर्फ बाबू शब्बीर शेख (३०), सीमाब करीम शेख उर्फ गुड्डू चपाती (२९) असे अटक करण्यात आलेल्या तस्कारांची नावे आहेत. कल्याण रेल्वे स्थानक, रेतीबंदर भाग, ठाकुर्ली ९० फुट रस्ता भागात गांजाची तस्करी वाढत असल्याने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या समाजकंटकांच्या मार्गावर पोलीस आहेत. तरुण वर्ग अंमली पदार्थ सेवनाकडे अधिक संख्येने ओढला जात असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा… ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक विजयानंतर केला जल्लोष
कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर भागातील पुलाखाली दोन जण गांजा विक्रीसाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे हवालदार सुरेश पाटील, सचिन साळवी यांना मिळाली होती. पोलिसांनी साध्या वेशात पुलाखाली सापळा लावला होता. ठरल्या वेळेत दोन जण दुचाकीवरुन रेतीबंदर मधील पुलाखाली आले. दुचाकी बाजुला उभी करुन ते त्या भागात घुटमळू लागले.
हेही वाचा… वाढत्या तापमानासह दमटपणाने ठाणेकर घामाघूम; तापमान चाळीशीआत, पण दमटपणा चाळीशीपार
हेच गांजा तस्कर असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्यांना हटकले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीची तपासणी केली त्यावेळी त्यांना दुचाकीच्या डीकीमध्ये सहा किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. हा गांजा त्यांनी कोठुन आणला. तो गांजा ते कोणाला विकणार होते, याची माहिती पोलीस घेत आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला आहे.