आणखी सहा पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव; तीन विभागीय उपअधीक्षकांची पदनिर्मिती
वाढत्या नागरीकरणासोबतच फोफावत चाललेल्या वसई-विरार शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांना आता आणखी बळ मिळणार आहे. सध्या सात पोलीस ठाण्यावर असलेला कायदा व सुव्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी सहा नवीन पोलीस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव वसई पोलिसांनी शासनाकडे दिला आहे. तो मंजूर झाल्यास वसईत एकूण १३ पोलीस ठाणी होणार असून पोलिसांचे मनुष्यबळही वाढणार आहे. त्यासोबतच तीन नवीन विभागीय पोलीस उपअधीक्षकांची पदेही वसईत तयार होतील.
वसई विरार शहरात एकूण सात पोलीस ठाणी आहेत. त्यात वसई, माणिक पूर, विरार, अर्नाळा सागरी, वालीव, नालासोपारा आणि तुळींज या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सहा पोलीस ठाण्यांत मिळून अवघे ६३४ एवढेच पोलीस बळ आहे. वसई विरार शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यातच शहरातील बेकायदेशीर वसाहती गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनू लागल्या आहेत. वसई विरारच्या गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. २०१५ या वर्षांत वसईत ४४ हत्या, ४४५ घरफोडय़ा, १२३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, अपुरे पोलीस बल आणि अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे पोलिसांनी या गुन्हेगारी रोखण्यास अपयश येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात जास्तीत जास्त वर्षभरात ३०० गुन्हे नोंदले गेले पाहिजेत. त्याच्यावर संख्या गेली तर तपास करताना अनेक अडचणी येतात आणि फिर्यादींनाही न्याय मिळत नाही. मात्र विरार पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात ८७५ गुन्ह्यांची नोंद झाली. पोलीस यंत्रणा हाताळण्यासाठी शहरात एकच उपअधीक्षक आणि एक उपविभागीय पोलीस अधीक्षक आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात अडचणी येत आहेत.
या पाश्र्वभूमीवर वसई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच आचोळे, पेल्हार आणि मांडवी ही तीन पोलीस ठाणी निर्माण करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर गृहविभागाने पोलीस महासंचालकांना स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या जोडीलाच आता पोलिसांनी आणखी तीन पोलीस ठाणी तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात वालीव पोलीस ठाण्याचे विभाजन करून नायगाव पूर्व हे एक स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून कण्हेर आणि बोळींज या ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे.
श्वानपथक, बॉम्बशोधक पथकच नाही
दीड वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यानंतर ही शहरे पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयांना जोडली गेली आहेत. परंतु अद्याप पालघर जिल्ह्यात स्वतंत्र बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक (बीडीडीएस), श्वानपथक आणि फिंगर प्रिंट पथक नाही. या सर्व गोष्टींसाठी पोलिसांनी ठाणे पोलिसांवर अवलंबून राहावं लागते. कुठेही बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आला किंवा तपासणी करायची असल्यास ठाण्याहून श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथक मागवावे लागते. त्यात बराच वेळ जातो आणि त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

वसईतली सध्याची पोलीस ७ पोलीस ठाणी
वसई, नालासोपारा, विरार, माणिकपूर, वालीव, तुळींज, अर्नाळा सागरी

नवीन पोलीस ठाणी
मांडवी, आचोळे, पेल्हार, विरार (पश्चिम), कण्हेर, नायगाव (पूर्व)

आम्ही या तीन नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे याशिवाय नालासोपारा, वसई विरार अशा तीन उपविभागीय पोलीस अधीक्षकची पदे तयार करण्याची शिफारस केली आहे. यामुळे मनुष्यबळ मिळेल, तसेच नियोजनबद्धरीत्या काम करता येईल.
– श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

Story img Loader