ठाणे : येथील साकेत रोड परिसरात शुक्रवारी दुपारी एक रिक्षा उलटून चालकासह प्रवासी असे एकूण ६ जण जखमी झाले. यामध्ये एका चार वर्षीय मुलीचा समावेश असून जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाला चक्कर आल्याने त्याचा रिक्षावरील ताबा सुटून हा अपघात झाला. रिक्षाचालक शिवकुमार जयस्वाल (५०), सृष्टी सचिन पाटील (४), शितल सचिन पाटील (३०), स्नेहल मिश्रा (२७), यश पाटेकर (२९), विकास सिंग (२४) अशी जखमींची नावे आहेत.
हेही वाचा >>> ठाणे स्थानकापर्यंतची प्रवाशांची पायपीट बंद, तुळईचे काम पुर्ण झाल्याने रस्ता वाहतूकीसाठी खुला
रिक्षाचालक शिवकुमार हे ठाणे स्थानक ते काल्हेर या मार्गावर रिक्षा चालवितात. शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजता ते प्रवाशांना घेऊन काल्हेरच्या दिशेने जात होते. त्यांच्या रिक्षामध्ये सृष्टी पाटील, शितल पाटील, स्नेहल मिश्रा , यश पाटेकर, विकास सिंग हे प्रवासी बसलेले होते. साकेत येथील पोलिस मैदानासमोरील रस्त्यावरून रिक्षा जात असताना शिवकुमार यांना चक्कर आली. यामुळे त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा उलटून अपघात झाला. या घटनेत सहा जणांना दुखापत झाली असून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलीस आणि शहर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.