उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प ५ येथील शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची धारधार चाकूने सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली आहे. शब्बीर शेख या परिसरात मटका जुगार चालवत असल्याची माहिती आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उल्हासनगर कॅम्प ५ च्या जय जनता कॉलनीमध्ये शब्बीर शेखच्या मटका जुगाराचा धंदा चालायचा. या धंद्याला राजकीय सरंक्षण मिळावे यासाठी चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करीत शाखाप्रमुख पद मिळविले होते. त्यानंतर शब्बीरने आसपासच्या भागात दहशतीचे वातावरण तयार केल्याची माहिती आहे. पंधरा दिवसांपूर्वी शब्बीर काही सहकाऱ्यांनी परिसरातील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे कळते आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. याच रागातून पाच ते सहा जण शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शब्बीरच्या जय जनता कॉलनी येथे मटक्याच्या जुगार अड्ड्यावर शिरले. त्यांच्या हातात धारदार सुरे आणि तोंडावर कपडा बांधला असल्याचे पाहून शब्बीरने पळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो पकडला जाऊन मारेकऱ्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
हेही वाचा… ठाण्यातील ‘प्रशांत कॉर्नर’ च्या बेकायदा बांधकामासह शेडवर कारवाई
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी उल्हासनगर गुन्हे शाखा आणि हिललाईन पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले आहेत.