डोंबिवली- येथील औद्योगिक क्षेत्रातील जय इंडस्ट्रिज रासायनिक कंपनीत सोमवारी सहा कामगारांच्या अंगावर भट्टीमधील कोळसा आणि वायू अंगावर उडून सहा कामगार भाजले. या कामगारांवर नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भट्टीजवळ काम करताना कामगारांना द्यावयाच्या आवश्यक सुरक्षिततेच्या सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन दिल्या नाहीत म्हणून ही घटना घडली. त्यामुळे कंपनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी जखमी कामगार विवेक मिश्रा याच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ज्वलनशील पदार्थ अंगावर उडाल्याने कामगार २० ते ३० टक्के भाजले आहेत.औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांमध्ये अकुशल कामगारांची संख्या अधिक आहे. त्यांना पुरेशा सुरक्षिततेच्या सुविधा प्रशासन देत नाही. त्यामधून अशा घटना घडतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.