सुमारे अडीच-पावणेतीन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. चाळीसगाव रेल्वे स्थानकात एक सहा वर्षांची मुलगी रडत इकडेतिकडे फिरत होती. काही प्रवाशांनी तिची विचारपूस सुरू केली. पण प्रवाशांच्या प्रश्नाच्या भडिमाराने ती अधिकच गांगरली. थोडय़ा वेळातच तेथे पोलीस आले. त्यांनी तिला गर्दीतून बाजूला नेले आणि मायेने चौकशी सुरू केली. आपलं नाव मोनिका आहे आणि आपण डोंबिवलीत राहतो, हे तिने सांगितलं. पण त्या पलीकडे तिला काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे तिच्या आई-बाबांचा शोध घ्यायचे पोलिसांनी ठरविले. तिच्या घरचा पूर्ण पत्ता नव्हता. शिवाय सहा वर्षांची मुलगी हरवल्याची तक्रारही कुठेच नव्हती. त्यामुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले. शोधमोहिमेतही हाती काहीच न लागल्याने तपासकार्य थांबवण्यात आले आणि नियमानुसार मोनिकाला चाळीसगाव येथील बालसुधारगृहात पाठवले गेले.
चाळीसगावच्या बालसुधारगृहात ती जेमतेम महिनाभरच राहिली. घराची, आईवडिलांची आठवण येत असल्याने ती खूप रडायची. डोंबिवलीत आपले घर आहे, तेथे मला जायचे आहे, अशा विनवण्या करायची. त्यामुळे चाळीसगाव येथून तिला भिवंडीतील बालसुधारगृहात पाठवण्यात आले. येथून डोंबिवली जवळ असल्याने कदाचित तिच्या पालकांचा काही शोध लागेल, अशी एक आशा होती. पण या सुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुली होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत मोनिकाचीही आबाळ होऊ लागली. शिवाय तिने घरी जाण्याचा तगादा लावला होताच. तिची करुणावस्था पाहून ठाणे येथील वर्तकनगर भागातील एका अनाथश्रमात तिला पाठवण्यात आले. येथे तिच्यासोबत २४ मुली राहतात. हळूहळू ती इथे रमू लागली आणि तिला घरचाही विसर पडू लागला.
त्या घटनेला अडीच वर्षे लोटली. साडेआठ वर्षांची मोनिका पालिका शाळेत जाऊ लागली.  ती आता चौथीच्या वर्गात आहे. आईवडील, घर, कुटुंब यांची तिला आता फारशी आठवण उरलेली नाही. अनाथाश्रम हेच तिचे जग बनले. पण तिच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली. पंधरा दिवसांपूर्वी ठाणे पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रतिभा मनोरे, पोलीस नाईक रोहिणी सावंत आणि स्वाती रहाणे या तिघी त्या आश्रमात गेल्या. या तिघी चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत आहेत. अनाथ आणि बेवारस मुलांची माहिती घेऊन त्यांच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे काम हे युनिट करते. या तिघींनी आश्रमातील सर्वच मुलींकडे चौकशी केली. त्यांना त्यांचे नाव, गाव, पत्ता आणि आई-बाबा आदींविषयी विचारले. पण, २४ पैकी चार मुलींनी थोडीफार माहिती दिली. त्यात मोनिकाचा समावेश होता. तिने डोंबिवलीचा पुन्हा उच्चार केला. मात्र, त्याव्यतिरिक्त तिने काहीच सांगितले नाही. मग, या तिघींनी थोडा विचार केला आणि गावाची नावे सांगून पाहूयात. गावाचे नाव ओळखले तर काहीतरी धागा मिळू शकतो. अशी तिघींनी एकमेकींशी चर्चा केली आणि तिच्यापुढे डोंबिवलीतील गावांची नावे सांगू लागल्या. ‘यापैकी कोणते गाव असेल तर आम्हाला सांग.’ असे तिघींनी तिला सांगितले. गावांची नावे सांगत असतानाच आयरे गावाचे नाव आले आणि तिने त्यांना थांबविले. थोडे मागचे आठवले आणि याच गावात राहत असल्याचे सांगितले. मग या तिघींनी कार्यालयात आल्यावर मोनिकाने दिलेल्या माहितीचा मागोवा घ्यायचे ठरविले. या माहितीतून कदाचित तिला तिचे आई-बाबा मिळू शकतात, याचा अंदाज बांधत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या. या तिघींनी डोंबिवलीतील आयरे गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अडीच वर्षांपूर्वी कुणाची मुलगी हरवली होती का, अशी चौकशीही सुरू केली. स्थानिक रहिवाशांना तिचे छायाचित्र दाखविले. मनोज पांडे यांची मुलगी हरविली आहे. असे कळताच त्यांनी मनोजचे घर शोधून काढले. मनोजनेही मुलगी हरवल्याचे सांगितले. मग मनोजला व त्याच्या पत्नीला कार्यालयात आणण्यात आले. तेथे मोनिकालाही आणण्यात आले. मनोजला पाहताच मोनिकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. अडीच वर्षांनी तिला तिचे कुटुंब मिळाले. खाकी वर्दीतल्या माणुसकीने एका चिमुरडीला तिचे जग परत मिळवून दिले.
पण ही कहाणी येथेच संपलेली नाही. प्रत्यक्षात मनोज हा मोनिकाचा भाऊ आहे. मोनिकाला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. या तिघांचीही लग्ने झाली आहेत. मोनिकाचा जन्म या तिघांनंतर खूप वर्षांनी झाला. ती पाच दिवसांची असतानाच तिची आई तिला सोडून गेली. वडिलांनीही तिची जबाबदारी घेण्याऐवजी तिला मनोजच्या हवाल्यावर सोडून काढता पाय घेतला. तेव्हापासून मनोजने तिचा सांभाळ केला. तिच्या वडिलांच्या जागीही त्याने स्वत:चे नाव लावले. आज मोनिका आपल्या कुटुंबासोबत आहे. पण तिच्यावर ओढवलेल्या या घटनेतील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मोनिका हरवलीच कशी, ती हरवल्याची तक्रार का दाखल झाली नाही, मनोजने तिचा शोध घेतला की नाही, असे अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत. पोलिसांनीही त्या दृष्टीने तपास चालवला आहे. कदाचित त्यातून आणखीही काही गौप्यस्फोट होऊ शकेल. पण एका सहा वर्षांच्या मुलीला अडीच वर्षांनी आपलं कुटुंब मिळालं, हीच पोलिसांसाठी समाधानाची गोष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six year old girl meet family after two and half month