कल्याण : सहा वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये राहत असलेल्या एका सात वर्षाच्या बालिकेवर एका ३३ वर्षाच्या इसमाने लैंगिक अत्याचार केला होता. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी इसमाला अटक करून त्याच्यावर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश पी. आर. अष्टुकर यांनी आरोपी इसमाला बाल लैंगिक अत्याचार कायद्याने २३ वर्ष सश्रम कारावास आणि सहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आशुतोष कृपाशंकर चौबे (३३) असे कारावास झालेल्या इसमाचे नाव आहे. चौबे याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्याने पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले. हवालदार ए. आर. गोगरकर, हवालदार भालचंद्र पवार यांनी न्यायालय, पोलीस समन्वयक म्हणून काम पाहिले. याप्रकरणाचा तपास अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, तपास अधिकारी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी केला होता.

या गुन्ह्याची माहिती अशी, की पती, पत्नी, त्यांची एक मुलगी, एक मुलगा असे कुटुंब अंबरनाथ भागात राहते. पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होती. १९ जुलै २०१९ रोजी पीडित मुलीची तब्येत ठिक नसल्याने ती शाळेत न जाता घरीच होती. मुलीच्या आईने तिला डाॅक्टरकडे नेऊन आणले होते. दुपारच्या वेळेत मुलीची आई घरातील कामे उरकून घरातच झोपली होती. पीडिता घराबाहेर उभी असताना त्यावेळी एका इसमाने पीडित मुलीला तुझे वडील तुला तिकडे बोलवत आहेत असे सांगत तिला जवळ बोलावून घेतले. तिला घट्ट मिठी मारून, तिच्या तोंडावर हात ठेऊन तिला झुडपे असलेल्या निर्जन ठिकाणी नेले. तेथे इसमाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी मोठ्याने ओरडू पाहत असल्याने इसमाने मुलीच्या दातावर जोरादार बुक्की मारून तिचा दात पाडला. तिच्या तोंडातून रक्त सुरू झाले. एक इसम एका बालिकेवर अत्याचार करत असल्याचे काही पादचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पीडितेची इसमाच्या ताब्यातून सुटका केली. पादचाऱ्यांनी इसमाला पकडून ठेवले. पीडितेला तिच्या घरी आणले. पीडितेने घडला प्रकार आईला सांगितला. पादचाऱ्यांनी संबंधित इसमाला पीडितेच्या घराजवळ पकडून आणले होते.

पीडितेच्या आई, वडिलांनी तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाणे गाठून तेथे आरोपी इसम आशुतोष चौबे विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ आशुतोष चौबेला अटक केली. याप्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सबळ पुराव्यांचे आधारे चौबे याला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Story img Loader