पाच महिन्यांपूर्वीचा प्रसंग. भिवंडी येथील मानकोली भागात एक चहाची टपरी आहे. या टपरीवर लहु नावाचा २२ वर्षीय तरुण ग्राहकांना चहा देण्याचे काम करायचा. वसई परिसरातील अरविंद सरोज यांच्याकडे तो रहायचा. अरविंद हे ट्रकचालकाचे काम करतात. वसई भागात त्यांना लहु सापडला होता. त्यावेळी तो खूप लहान होता. सरोज दाम्पत्याला चार मुले आहेत. तरीही त्यांनी लहूला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले आणि त्याचे नाव लव असे ठेवले. तो सुद्धा त्यांना मम्मी आणि पप्पा या नावानेच हाक मारतो. गेल्या चार वर्षांपासून लहु या टपरीवर काम करीत होता आणि दररोज मानकोली ते वसई असा प्रवास करत होता. ठाणे वाहतूक शाखेच्या भिवंडी युनीटमधील पोलीस नाईक नामदेव हिमगिरे हे त्या टपरीवर चहा पिण्यासाठी नेहमी जायचे. त्यामुळे लहुसोबत त्यांची चांगली ओळख होती. टपरीवर चहा पिताना हिमगिरे हे त्याच्यासोबत गप्पा मारायचे.
एके दिवशी सहज बोलता बोलता हिमगिरे यांनी लहूकडे त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. मात्र, त्यावर तो निशब्द झाला. त्याच्या खिन्न चेहऱ्याकडे पाहून हिमगिरे यांनी त्याची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा लहानपणी घरातून वाट चुकल्यामुळे हरवल्याचे त्याने सांगितले. लहूची व्यथा ऐकल्यानंतर हिमगिरे यांनी त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यात निर्धार केला आणि त्यासाठी लहूकडून आणखी माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र, लहूच्या बोलण्यातून कोणताच धागादोरा हाती लागत नव्हता. त्यावेळी सहा सात वर्षांचा असल्याने लहूला त्यावेळचे फारसे काही आठवत नव्हते. मात्र, आपण गावातील एका मालकाकडे गुरे चरण्याचे काम करत असल्याचे त्याने हिमगिरे यांना सांगितले. त्यावेळीच एका ट्रकमध्ये बसून आपण घरची वाट चुकल्याचे तो म्हणाले. अर्थात याबाबतचा आणखी तपशील त्याला आठवत नव्हता. मात्र, गावातील विठ्ठल मंदिर, एक नदी, घाट अशा गोष्टी त्याच्या आठवणींत पुसटपणे डोकावत होत्या. तरीही त्या माहितीच्या आधारे हिमगिरे यांनी लहूच्या कुटुंबाचा शोध सुरू केला.
गुगुल नकाशाच्या आधारे असा कोणता परिसर आहे का, हे त्यांनी तपासले. ठाणे जिल्ह्य़ातील वाडा, मोखाडा आणि अन्य भागात त्याच्या पालकांचा शोधही घेतला, पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. काही दिवसांनंतर ते लहूला सोबत घेऊन ते रायगड भागात गेले. पाली घाटातून जात असताना त्याला परिसर काहीसा परिचित वाटला. त्यामुळे त्यांनी या परिसरात त्याचा पालकांचा शोध सुरू केला. त्याचवेळी त्यांना या भागात विठ्ठल मंदीर सापडले. योगायोगाने तिथे गुरे चरण्याचे काम करीत असलेल्या मालकाचा मुलगाही त्यांना सापडला. खूप वर्षांपुर्वी गावातून एखादा मुलगा लहानपणी बेपत्ता झाला आहे का, अशी चौकशी त्यांनी त्याच्याकडे केली. त्यावेळी त्याने गावातून एक मुलगा बेपत्ता झाला असल्याचे सांगत त्याच्या घरचा पत्ता त्यांना दिला. त्या पत्त्यावर हिमगिरे पोहचले, पण घरामध्ये बेपत्ता झालेल्या मुलाचे आई-वडील नव्हते. घराच्या शेजारीच बेपत्ता मुलाचे चुलते राहतात. त्यामुळे हिमगिरे यांनी त्याच्याकडे बेपत्ता झालेल्या मुलाची चौकशी केली. त्यावेळी चुलत्यांनी बेपत्ता मुलाबाबत माहिती दिली. त्यामध्ये बेपत्ता झालेला मुलगा आणि लहु या दोघांचे वर्णन एकमेकांशी मिळते-जुळते होते. त्यानंतर लहुच त्यांचा मुलगा असल्याची खात्री हिमगिरे यांना पटली. त्याचे आई-वडील विट्टभट्टीवर काम करत असल्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे कामासाठी गेले होते. त्यामुळे पोलिसांनी सर्व खातरजमा करून लहुला त्याच्या चुलत्यांच्या ताब्यात दिले. तब्बल सोळा वर्षांनंतर आदिवासी कुटुंबातील लहूची त्याच्या आई-वडिलासोबत भेट झाली. घरातून लहु बेपत्ता झाल्यानंतर त्यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली नव्हती. असे असतानाही पोलीस नाईक हिमगिरे यांच्या प्रयत्नांमुळे लहुला त्याचे आई-वडील मिळाले. त्यांच्या या कामगिरीबदल्ल ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

Story img Loader