सध्या आपण स्किल्ड बेस्ड एज्युकेशन किंवा स्किल डेव्हलपमेन्ट प्रोग्राम असे वारंवार ऐकतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कलाकौशल्य विकसित करण्यावर भर दिला आहे आणि त्या दृष्टीने शैक्षणिक धोरणातही हळूहळू बदल होऊ पाहत आहे. अभ्यासाबरोबरच कलाकौशल्य विकसित करण्यावर, एखादी कला आत्मसात करण्यावर मोदीजींनी विशेष भर दिला आहे. ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह तर आहेच, पण शिक्षण क्षेत्रात एक मोठा बदल होण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल आहे.
ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेत इ. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना कार्यानुभव विषयांतर्गत हस्तव्यवसायविषयक मार्गदर्शन दिले जाते. या विषयांतर्गत मुलांना विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू तयार करण्यास शिकविले जाते आणि त्यात खऱ्या अर्थाने वैविध्य आणण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील क्षमता विकसित व्हाव्यात आणि भविष्यात त्यांना अर्थार्जन करण्याच्या दृष्टीने काही पर्याय उपलब्ध व्हावा, अशा व्यापक दृष्टीने हा विषय शिकविण्यावर विशेषत्वाने भर दिला जातो.
रक्षाबंधन/ राखीपौर्णिमा सण हा मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि आवडीचा असा सण. शाळेत विद्यार्थ्यांना अनेकविध गोष्टींपासून कलात्मक राख्या तयार करायला शिकविले जाते. लोकर, लेस, टिकल्या, रंगीबेरंगी मणी, सॅटिनची/ ऑरगंडी/ स्टॉकिंग्जची फुले वापरून केवळ इथेच थांबत नाही तर तयार केलेली गोष्ट गिऱ्हाईकाचे लक्ष वेधून घेईल, त्याला विकत घ्यावी असे वाटेल त्या दृष्टीने पॅकिंग करून कशा पद्धतीने मांडावी याचेही सातत्याने मार्गदर्शन दिले जाते. शाळेत दरवर्षी प्रदर्शन मांडले जाते, त्यामुळे इतर विद्यार्थी राख्या विकत घेतात. यामधून जो निधी उपलब्ध होतो त्याचाही विनियोग चांगल्या कामासाठी केला जातो. उदा. एखाद्या संस्थेला छोटीशी मदत किंवा सामाजिक कार्यासाठी, शाळेतील अत्यंत गरजू विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी इ.
गणेशोत्सवाच्या वेळी शाडू मातीची गणेश मूर्ती तयार करण्याविषयक कार्यशाळा आयोजित केली जाते. त्यासाठी छोटे साचे आणले जातात. शक्यतो पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांवरही संस्कार होतात, कारण ती काळाची गरज आहे. पुठ्ठय़ांचे हार तयार करून त्याची सजावट कशी करावी, कागदी/ कापडी/ लोकरीपासून फुले तयार करण्यास शिकविले जाते. एकंदरीतच पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले जाते.
दिवाळी सणाच्या निमित्ताने नावीन्यपूर्ण कल्पनांच्या साहाय्याने आकर्षक पाकिटे करण्यावर भर दिला जातो. कंदील तयार करण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जाते. इयत्ता पाचवी, सहावी व सातवी असा प्रत्येकाचा कंदील वेगळा असतो. स्वत: तयार केलेला कंदील आपल्या घरी लावताना त्यांना स्वनिर्मितीचा आनंदही मिळतो. काही वेळा विद्यार्थी एकत्र येऊन कंदील तयार करून विकतात आणि सुट्टीतल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करताना अर्थार्जनही करतात. अशा विद्यार्थ्यांना होलसेल मार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. कार्यानुभव विषयाच्या शिक्षिका कल्पना बोरवणकर म्हणतात, ‘‘या प्रयत्नांमधून मुलांमधील कलागुण विकसित होण्यास नक्की मदत होते, त्याशिवाय कल्पकताही वाढीस लागते. अनेकविध गोष्टी आकर्षक रीतीने तयार करण्याविषयी ते विचार करू लागतात. पेपर कटिंग/ घडय़ा घालणे/ जोडणी करणे/ सुबक वस्तू तयार करणे/ त्यांचे पॅकिंग व नीट मांडणी, विक्री कौशल्य, व्यवहार इ. अनेक कौशल्येही वाढीस लागतात. काही विद्यार्थी एकत्र येऊन सहकार्याने ग्रीटिंग्ज/ कंदील/ राख्या तयार करून विकतात. यातून संघभावना, परस्परसहकार्य वाढीस लागते. भविष्यात अर्थार्जनाचा पर्याय म्हणून या कलाकौशल्यांचा ते विचार करू शकतात.’’
नाताळ सणाच्या आधी मेणबत्त्या तयार करून सजावट करण्यास शिकविले जाते. फ्लोटिंग मेणबत्त्या, मेणाचे आइस्क्रीम कप हेही करायला शिकविले जाते. आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन या मेणबत्त्यांप्रमाणे सॅण्ड पेन्टिंग, रांगोळी पेन्टिंग, स्टोनची रांगोळी, ऑरगंडी/ क्रेप/ डुप्लेक्स पेपर/ स्टॉकिंग्जचे पुष्पगुच्छ तयार करण्यास शिकविले जाते. टाकाऊतून टिकाऊ किंवा उपलब्ध गोष्टींचा वापर करून कलात्मक गोष्टी तयार करण्याची दृष्टी मुलांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. जुन्या साडय़ा, ओढण्या यांचा उपयोग करून हाती शिवणकाम करून विद्यार्थी पिशव्या तयार करतात. विविध प्रकारचे बॉक्सेस करायला शिकतात. साधारणपणे इ. पाचवीमध्ये पहिल्या घडीपासून वस्तू तयार होण्यापर्यंतच्या प्रक्रियेचा सराव करताना ओरिगामी शिकतात. सहावीमध्ये आलेखवहीमध्ये आकृती काढण्यापूर्वी माप कसे घ्यावे आणि मग ती नेमकेपणाने कशी काढावी ते शिकतात. सातवीमध्ये आकृती काढून त्याप्रमाणे वस्तू कशी तयार करायची ते विद्यार्थी शिकतात. आकृती कशा ओपन होतात आणि मग मोजमाप घेऊन प्रतिकृती तयार करण्याचा सराव करतात. दरवर्षी बेडेकर मराठी शाळेमध्ये वार्षिक हस्तकला प्रदर्शन आयोजित केले जाते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे वर्षभरातील कलाकौशल्य अनुभवता येते.
डॉ. आंबेडकर रोड येथील शिशू ज्ञानमंदिर प्राथमिक/ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कसोशीने केला जातो. या शाळेत येणारी बहुसंख्य मुले कष्टकरी आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील, घरी शिक्षणासाठी पोषक वातावरणाचा अभाव असलेली. त्यामुळे हे वास्तव ओळखून शाळा प्रयत्नशील राहते. कार्यशिक्षणांतर्गत इ. नववी/ दहावीसाठी पाककला विषयाचे मार्गदर्शन दिले जाते. भविष्यात (किंवा खरे तर वर्तमानकाळातही) दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना अर्थार्जन करता यावे या दृष्टीने शाळेतर्फे या विषयाचे मार्गदर्शन दिले जाते. काळाची गरज, बदललेली लोकांची आवड लक्षात घेऊन पदार्थाची निवड करताना ते खर्चीक असणार नाहीत याचा प्रामुख्याने विचार केला जातो. भेळ, दाबेली, चाटचे पदार्थ, सॅण्डविच, कोरडय़ा चटण्या (लसूण/ तीळ/ कारळे इ.) असे पदार्थ प्रात्यक्षिक करून शिकविले जातात. होलसेल मार्केटमध्ये जाऊन विद्यार्थी सामूहिक खरेदी करतात आणि येणारा खर्च वाटून घेतात. विद्यार्थ्यांना परस्परसहकार्याचे, संघभावनेचे महत्त्व कळते, त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून खरेदीचे, पदार्थ तयार करण्याचे काम आवडीने करतात. शिक्षकही त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य करतात. ही शाळा ज्याप्रमाणे पालक-विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्न करते, त्याचप्रमाणे शिकण्याची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात त्यांनी स्वत:च्या पायांवर उभे राहावे म्हणून उपक्रम राबवीत असते. म्हणूनच त्यांनी केलेल्या चटण्या, काही पदार्थ शिक्षकच स्वत: विकत घेतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात.
शाळेच्या बाकावरून : अर्थार्जनाचा नवा पर्याय
गणेशोत्सवाच्या वेळी शाडू मातीची गणेश मूर्ती तयार करण्याविषयक कार्यशाळा आयोजित केली जाते.
Written by हेमा आघारकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-07-2016 at 03:35 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skilled based education in dr baedeker vidya school