डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सरकता जीना, उद्वाहन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. जीना, उद्वाहन बंद असल्याने प्रवाशांना स्कायवाॅकच्या पायऱ्या चढून फलाटावर जावे लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांचे सर्वाधिक हाल होतात.
ठाणे स्थानकात ‘लोकल’मध्ये तांत्रिक बिघाड; वेळापत्रकावर परिणाम
सकाळच्या वेळेत कार्यालय गाठण्यासाठी नोकरदारांची घर ते कार्यालय अशी धावपळ असते. रेल्वे स्थानकाजवळ रिक्षेतून उतरल्यावर झपटपट फलाटावर पोहचण्यासाठी बहुतांशी प्रवासी सरकता जीना, उद्वाहनाचा वापर करतात. अनेक प्रवाशांना हदयरोग, अशक्तपणा व इतर आजार असतात. त्यांना स्कायवाॅकच्या पायऱ्या चढल्या तरी दम लागतो. अशा प्रवाशांना सरकता जीना, उद्वाहन आधार आहे. या दोन्ही यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. अनेक प्रवाशांनी डोंबिवली स्थानक व्यवस्थापकांकडे या दोन्ही यंत्रणा सुरू करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत. स्थानिक रेल्वे अधिकारी ‘आम्ही या तक्रारी वरिष्ठांकडे पोहचविल्या आहेत. वरून जशी हालचाल होईल त्याप्रमाणे दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल,’ अशी साचेबध्द उत्तर देत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले.
उद्वाहनचा वापर रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले गोदाम म्हणून करतात –
डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे अडीच ते तीन लाख प्रवासी प्रवास करतात. यामधील बहुतांशी प्रवासी उद्वाहन, सरकत्या जिन्यांचा वापर करतात. डोंबिवली पूर्व, पश्चिम येजा करणारे नागरिक या उद्वाहन, सरकत्या जिन्यांचा वापर करतात. या दोन्ही यंत्रणा बंद असल्याने नागरिकांचेही हाल होत आहेत. बंद असलेल्या उद्वाहनचा वापर रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले गोदाम म्हणून करतात. सामानाचे गठ्ठे उद्वाहनमध्ये ठेवल्याने चोरी होत नाही, असे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. दुपारच्या वेळेत आराम करण्यासाठी काही फेरीवाले उद्वाहनचा वापर करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
वरिष्ठांना कळविले की काही तासाने सरकता जिना सुरू केला जातो –
“ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा सातत्याने बंद पडतो. त्यामुळे प्रवाशांना स्थानक अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्या लागतात. रेल्वेच्या वरिष्ठांना कळविले की काही तासाने सरकता जिना सुरू केला जातो.” , असे ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या मंदार अभ्यंकर या प्रवाशाने सांगितले.
पावसाचे पाणी उद्वाहन, सरकत्या जिन्यांच्या तळाच्या यांत्रिक यंत्रणेमध्ये जाते –
डोंबिवली रेल्वे स्थानकातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “डोंबिवली पूर्वेतील उद्वाहन आणि सरकता जिना चालविणारी विद्युत यांत्रिक यंत्रणा जमिनी खाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने या भागात रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी उद्वाहन, सरकत्या जिन्यांच्या तळाच्या यांत्रिक यंत्रणेमध्ये जाते. आतील विद्युत यंत्रणा बंद पडते. डोंबिवली स्थानकातील यांत्रिक यंत्रणा बंद पडल्यानंतर तत्काळ वरिष्ठांना अहवाल पाठविला जातो. त्याची दखल कितीपत घेतली जाते त्यावर पुढील कार्यवाही अवलंबून असते.” असे अधिकारी म्हणाले.
अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना सतत संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.