डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर झोपडपट्टी उभारण्याचे उद्योग गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहेत. डोंबिवली पूर्व व पश्चिमेकडे पालिकेचे एकही अधिकृत वाहनतळ अद्याप उभे राहू शकले नसताना पूर्वेकडील सावरकर मार्गावरील या आरक्षित भूखंडावर झोपडय़ा उभ्या राहू लागल्या आहेत. स्थानिक नगरसेविकेच्या तक्रारीनंतरही पालिकेने यावर अजिबात कारवाई केलेली नाही.
मंजुनाथ शाळा ते फडके मार्गाला जोडणाऱ्या सावरकर रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यातच येथे वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. याचा परिणाम या मार्गावरील वाहतूक कोंडी वाढण्यात होतो. असे असताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांना सावरकर रस्त्यावरील वाहनतळ मोठा आधार आहे. या ठिकाणी वाहन उभे करून फडके रस्ता परिसरातील बाजारपेठेत खरेदीसाठी जाण्याचा चांगला पर्याय वाहन चालकांपुढे आहे.
वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून झोपडय़ा उभारण्याचे उद्योग सुरू झाले आहेत, अशी तक्रार या भागातील नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सावरकर रस्त्यावरील वाहनतळाच्या जमिनीला संरक्षक भिंत बांधून घ्यावी म्हणून आपण प्रशासनाकडे सतत तगादा लावला आहे. भिंत बांधण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेने ही भिंत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. तरीही प्रशासन खासगी व्यक्तीची पाठराखण करीत या जमिनीला कुंपण स्वरूपाची भिंत बांधण्यास टाळाटाळ करीत असल्याची टीका नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा