उल्हासनगरः तुमची लहान मुलं सुद्धा घरातल्या खिडकीतल्या जाळ्यांमध्ये खेळण्यासाठी बसतात का. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण उल्हासनगर शहरात एका इमारतीत खिडकीच्या जाळीत बसून खेळणारी दोन लहान मुले जाळी तुटल्याने थेट खाली कोसळली आहेत. दुसऱ्या मजल्यावरून कोसळल्याची ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना उल्हासनगरच्या कॅम्प पाचमध्ये समोर आली. यात दोन्ही मुलांना दुखापत झाली आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.
अत्यंत दाटीवाटीचे शहर म्हणून उल्हासनगर शहर ओळखले जाते. जगातल्या सर्वात कमी चौरस फुटात अधिक लोकसंख्या वास्तव्यास असलेल्या शहरात उल्हासनगर शहराचा अग्रक्रम लागतो. त्यामुळे येथे मोकळ्या जागांचाही अभाव आहे. त्यामुळे लहानग्यांना घरातच खेळण्यावाचून पर्याय नाही. मात्र याच शहराच धोकादायक इमाारतींचा प्रश्नही तितका गंभीर आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. कॅम्प पाच भागातील गांधी चौक परिसरात हरे राम-हरे कृष्णा ही इमारत आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास यातील दुसऱ्या जमल्यावर एका घरात सहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी खिडकीत खेळत होते. खेळत असताना ते दोघेही घराच्या जाळीत बसले. खेळत असताना अचानक ही लोखंडी जाळी तुटली आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. जाळी तुटल्याने दोघे लहान मुले थेट दुसऱ्या मजल्यावर खाली कोसळली.
या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही मुले कोसळल्याने त्या दोघांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. दोघांची प्रकृती आता स्थीर आहे. पण या घटनेमुळे घरांच्या खिडक्यांच्या मजबुतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा घरांतील अशा जाळ्यांकडे लक्ष जात नाही. त्या जाळ्यांना बसवल्यानंतर वर्षानुवर्षे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांच्या खेळण्यासोबतच घरातील अशा लोखंडी खिडकी जाळ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.