दहा महिन्यांनंतरही आदर्श अंगणवाडी प्रकल्प कागदावरच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत यंत्रणा, ई-लर्निगची सुविधा, एलईडी टी.व्ही., यूएसबी पोर्टल, मुलांसाठी खुच्र्या आणि टेबल, जल शुद्धीकरण यंत्र, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा अशा अद्ययावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेल्या स्मार्ट अंगणवाडय़ा तयार करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. जिल्ह्यतून या योजनेसाठी आठ अंगणवाडय़ांची यादी शासनाकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, या अंगणवाडय़ांना अद्याप निधीच मिळू शकलेला नाही.

बालक आणि महिलांच्या सर्वागीण विकासासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेतून अंगणवाडीतील शून्य ते सहा  वर्ष वयोगटातील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी सध्या या मुलांना पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण केंद्रातून देण्याचा प्रयत्न आहे. यामधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अंगणवाडय़ांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून आदर्श अंगणवाडी अर्थात स्मार्ट अंगणवाडीची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार या अंगणवाडीसाठी विविध सोयीसुविधा देऊन तेथील बालकांना आनंददायी वातावरण निर्माण करण्याची योजना यामध्ये होती.

त्यापैकी ठाणे जिल्ह्य़ातील २०० अंगणवाडय़ांना स्मार्ट सुविधा मिळतील, असे घोषित झाले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा अंगणवाडय़ांच्या नावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र दहा महिन्यानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

स्मार्ट अंगणवाडीत काय?

स्मार्ट अंगणवाडी योजनेमध्ये विविध सेवा प्रदान करण्यात येणार असून त्यामध्ये सौर ऊर्जा संच हा महत्त्वाचा घटक असून त्यातून अंगणवाडी केंद्राला विद्युतपुरवठा होणार आहे. त्यामुळे लोडशेिडगच्या काळात होणारा त्रास कमी होईल. इमारतीच्या भिंती, दरवाजे, फरशी आणि छताचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करून त्यावर प्राणी, फळे, फुले यांची चित्रे रंगवून वातावरण आनंददायी करण्याचा प्रयत्न होईल. याशिवाय एलईडी टीव्ही संच, यूएसबी पोर्टलच्या साहाय्याने मुलांना व्हिडीओचा वापर करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वर्गातील ३० मुलांना टेबल-खुच्र्या दिल्या जातील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart anganwadi waiting for funds
Show comments