मुंबईच्या पलीकडे फोफावत चाललेल्या नागरीकरणाची केंद्रे असलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील बातम्यांचा वेध घेणारे ‘लोकसत्ता ठाणे’ हे सहवृत्तपत्र १५ जानेवारी २०१५पासून सुरू करण्यात आले.  नागरीकरणाच्या आड येणाऱ्या अडचणी, नागरीकरण होताना निर्माण होणारे प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा यांना वाचा फोडण्याचे तत्त्व या सहवृत्तपत्राने सुरुवातीपासूनच पाळले आहे. त्यामुळेच येत्या १५ जानेवारीला होत असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे’च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने नागरी प्रश्नांशी निगडित मुद्दय़ांना हात घालणारा ‘लोकसत्ता लोकसंवाद’ हा उपक्रम आजपासून सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरण, प्रदूषण, वाहतूक, परिवहन, रस्ते, रेल्वे, स्वच्छता, पाणीपुरवठा, कायदा व सुव्यवस्था अशा मुद्दय़ांवर त्या त्या क्षेत्रातील जाणकार-तज्ज्ञ आपली भूमिका दररोज मांडणार आहेत. तर जाणकारांनी मांडलेल्या प्रश्नांवर महापालिका/जिल्हाधिकारी/ पोलीस या प्रशासकीय यंत्रणांमधील जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका वर्धापन दिनाच्या (१५ जानेवारी) अंकात प्रसिद्ध करण्यात येईल.

ठाणे शहरात पर्यावरणीयदृष्टय़ा मोठे वैविध्य असून मुबलक तलाव, विस्तृत खाडीकिनारा, कांदळवनांचे पट्टे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे वनक्षेत्र या सगळ्याने हे शहर बहरलेले आहे. या शहराचा विकास ‘स्मार्ट सिटी’ म्हणून करत असताना येथील जैवविविधतेच्या अंगाचा विचार होणे महत्त्वाचे ठरते. शहरात राहणाऱ्या माणसांप्रमाणेच येथील जैवविविधताही या शहराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचा विचार करूनच शहराचे नियोजन होणे आवश्यक आहे. यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात जैवविविधतेच्या संरक्षणासाठी हरितपट्टे तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने पुढाकार घेण्याबरोबरच शहरातील नागरिकांनीही पर्यावरणाच्या अंगाने शहर घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.

ठाण्यातील तलावांच्या संरक्षणाचा विचार करत असताना केवळ तलावाच्या काठावरचे सुशोभीकरण आणि तलावातील नौकाविहार म्हणजे तलाव टिकवणे नव्हे. प्रत्येक तलावाच्या पाण्याचा भाग, पाण्याचे अंतरंग आणि त्याच्या अजूबाजूला असलेला तलावाच्या काठावरचा उपभागही संरक्षित करणे महत्त्वाचे ठरते. शहरामध्ये इमारत बांधताना झाडे तोडून त्या बदल्यात नव्या झाडांची लागवड करण्याचा कायदा आहे. असे असले तरी तोडलेल्या झाडांच्या जागी कोणती झाडे लावलीत याच्यावर मात्र पालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे तोडल्यानंतर झाडांच्या जागी वेगळ्याच झाडांची लागवड केली जाते. यामध्ये पालिका प्रशासनाने हस्तक्षेप करून तोडलेल्या झाडांच्या जागी ठाणे शहराच्या वातावरणाला सुयोग्य असलेल्याच झाडांची लागवड करण्याची सक्ती करण्याची गरज आहे. ठाणे परिसरातील प्राण्यांना, पक्ष्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या झाडांची लागवड त्यामुळे शहरात होऊ शकेल. घोडबंदर, नौपाडा, वागळे, पाचपाखाडी प्रत्येक प्रभागात एकाच प्रकारची झाडे लावून हरितपट्टे विकसित केल्यास त्याचाही सकारात्मक परिणाम येथील जैवविविधतेवर होऊ शकेल. शहराचे पर्यावरणीय दृष्टय़ा नियोजन झाले, तर त्याचे फायदेसुद्धा येथे राहणाऱ्या माणसांना घेता येऊ शकतील. केवळ दिसण्यासाठीच नव्हे, तर जगण्यासाठीसुद्धा आल्हाददायक वातावरण इथे निर्माण होऊ शकेल.

ठाणे शहरातील पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी खाडीशिवाय अन्य दुसरा कोणताही पर्याय सध्या या शहरासमोर नाही. या खाडीवर वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे खाडी बुजवून टाकली जात असून, त्यामुळे शहराला भविष्यात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी खाडी नियोजनाची तत्काळ गरज असून खाडीची खोली, रुंदी कायम तशीच राहून पाणी वाहून नेण्याची त्याची क्षमता कायम  राहील याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. यासाठी प्रशासनाने प्रयत्न  करण्याची गरज असून अवैध बांधकामे, बिल्डर यांना वेळीच रोखावे लागेल.

 विवेक कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक

Story img Loader