अंध, बहुविकलांग मुलांसाठी अलीकडे अनेक शाळा निघाल्या आहेत. या शाळांमधून त्यांचे जीवनशिक्षण सुरू असते. पण ही मुले वयाने मोठी झाल्यावर, आता त्यांचे काय करायचे, असा प्रश्न उद्भवतो. वयाच्या विशीतही ही विशेष मुले पाच-सहा वर्षांचीच असतात. मात्र, १८ वर्षे वयानंतर त्यांना शाळेतून ‘निरोप’ घ्यावा लागतो. त्यानंतर या मुलांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो. थोडय़ाफार संस्था या क्षेत्रात काम करत असल्या तरी बहुतेक प्रकरणांमध्ये पालकांनाच एकत्र येऊन संघटना अथवा संस्था स्थापन करून अशा मुलांसाठी काम करावे लागते. मात्र, तरीही त्यांना ‘सोबत’ लागतेच. अशीच सोबत ठाण्यातील ‘सोबती’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना देत आहे.
मोत्यांची गुंफण करून त्यांनी केलेले तोरण खरेच दृष्ट लागण्यासारखे होते. कसलेल्या कारागिराप्रमाणे त्यांचे हात काम करत होते. समोरच्या थाळीतील एकेक मणी घेऊन जी रचना तोरणासाठी ते करत होते ते पाहता त्यांच्यात लपलेला कलावंत दिसत होता. एका शिस्तीत चाललेले त्यांचे काम थक्क करणारे होते. त्यांनी बनविलेल्या मण्यांच्या बांगडय़ा, तोरणे, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा पाहून या वस्तू अंध असलेल्या बहुविकलांग मुलांनी बनवल्या असतील यावर विश्वास ठवणे कठीणच. या मुलांची, त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची आणि पालकांची एकमेकांना असलेली ‘सोबत’ अनोखी म्हणावी लागेल.
ठाण्यातील ‘सोबती पेरेंट असोसिएशन’ची कहाणी म्हणून वेगळी.. एक जिद्दी संस्थेची.. अंध असलेल्या बहुविकलांग मुलांच्या पालकांची ही संघटना एका विशिष्ट विचाराने प्रवास करत आहे. या संस्थेतील सर्व मुले ही अंध तसेच बहुविकलांग आहेत. त्यामुळेच त्यांच्या पालकांपुढील प्रश्नही मोठा आहे. खरेतर ही एक मोठी समस्या आहे. या मुलांबरोबरच त्यांच्या पालकांच्या संयमाची, धीराची, चिकाटीची एक कसोटीच आहे. अशा विशेष मुलांसाठी आपल्याकडे शाळा असल्या तरी त्यांची संख्या तशी कमीच. त्यातही मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर शाळा संपते आणि मग काय, हा प्रश्न पालकांपुढे आ वासून उभा राहतो. अपंग ही संज्ञा अंध, मूक-बधिर, बहुविकलांग तसेच मतिमंद आदी सर्वासाठी वापरली जाते. परंतु मतिमंद व अन्य प्रकारचे अपंगत्व यामध्ये खूप मोठा फरक आहे. मतिमंद मुलांना जाणिवा व बोध नसतो अथवा कमी प्रमाणात असतो. त्यामुळे अशा विशेष मुलांच्या पालकांना मुलांच्या भोजन, स्वच्छता तसेच संरक्षणासह साऱ्यांचीच जबाबदारी घ्यावी लागते. त्यातही मूल अंधही असेल तर परिस्थिती आणखीनच गंभीर होते. त्यामुळेच अशा मुलांसाठी संस्था काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असे ‘सोबती पालक संघटने’चे सचिव प्रकाश बाळ यांनी सांगितले.
२००४ मध्ये ‘सोबती’ संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वीही काही पालक एकत्र येऊन काम करतच होते. पूर्वी ठाण्यातील निळकंठ व्यायामशाळेत ‘नॅब’च्या सहकार्याने उपक्रम चालवला जायचा. त्यांचे सहकार्य आजही आहे. पुढे मुले मोठी होऊ लागली तशी कायमस्वरूपी जागेची गरज निर्माण झाली. मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची किमान काही कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरले. यातूनच ‘सोबती’ने ठाणे व अंधेरी येथे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले. एकूण ११७ पालक एकत्र येऊन त्यांनी ही संस्था स्थापन केली. सध्या ठाणे पश्चिम येथील बी-केबीन येथील श्रेयानंद सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये हे केंद्र गेली अनेक वर्षे सुरूआहे. साडेसातशे चौरस फुटाच्या या फ्लॅटमध्ये या अंध असलेल्या बहुविकलांग मुलांना शिकविण्यासाठी चार प्रशिक्षित शिक्षक व दोन साहाय्यक आहेत. ते मुलांमधील कौशल्य विकसित करण्याचे काम करतात. यातूनच येथील मुले अनेक चांगल्या वस्तू बनविण्यास शिकले असून त्याच्या विक्रीमधूनही चांगले उत्पन्न मिळते. साधारणपणे १५ वर्षांपुढची १७ मुले येथे आहेत. त्यांना कृत्रिम ज्वेलरी, तोरण, ग्रीटिंग, दिवे तसेच मुखवाससारखी उत्पादने तयार करण्यास शिकवले गेले.
सामाजिक जाणिवेतून ‘सोबती’मध्ये काम करणारे काही जण आहेत. आपला वेळ अशा मुलांसाठी देणे ही खरेतर मोठी जबाबदारी, परंतु सुचेता दामले, स्वाती गोखले असो की मंगलाताई या साऱ्या जणी मनापासून या मुलांसाठी काम करतात. त्यांना आपण काही वेगळे करतोय असे वाटत नाही. ज्या प्रेमाने त्या या मुलांसाठी काम करतात, ते निश्चितच कौतुकास पात्र आहे. ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ ‘नॅब’चे वेळोवेळी सहकार्य लाभल्याचे प्रकाश बाळ आवर्जून सांगतात. अमेरिकेतील बोस्टनमधील ‘पार्किन्स इंटरनॅशनल’ या संस्थेची ‘सोबती’ ही पार्टनर आहे.
मुलांसाठी येथे दिवाळी पार्टीही होते. यातील काही मुले नियमित शाळेतही जातात. एक विद्यार्थी पालिकेच्या शाळेत आठवीमध्ये आहे. अंध आणि बहुविकलांग मुलांना शिकवणे ही एक कला आहे. येथील शिक्षक खूप प्रेमाने या मुलांना घडविण्यासाठी मेहनत घेतात. मुकुंद चितळे, शाम गोखले, हर्षां अडारकर, मंगेश देसाई आणि प्रकाश बाळ हे संस्थेची सर्व जबाबदारी सांभळत असून संस्थेचा दरमहाचा खर्च सुमारे सत्तर हजार एवढा आहे. पूर्वी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका अथवा शासनाकडे ‘सोबती’साठी जागा मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. त्यानंतर ठाण्याजवळ तरी जागा मिळावी यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले. याच काळात वसईचे आमदार विवेक पंडित यांनी मदतीचा हात पुढे केला. वाडा तालुक्यातील कासघर तिळसा येथे पाऊण एकर जागा देणगी म्हणून दिली. या मुलांसाठी कायमस्वरूपी केंद्र- ‘रिस्पाईट केअर’ असावे ही संकल्पना जागा मिळविण्यामागे होती. अपंग व्यक्तींच्या ज्या काही क्षमता आहेत, त्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याची क्षमता त्यांना मिळवून देणे, ही कल्पना वाडा येथील केंद्र उभारण्यामागे असल्याचे बाळ यांनी सांगितले. या जागेत दहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्याची योजना आहे. साधारणपणे दोन कोटी रुपये हा प्रकल्प उभारण्यासाठी लागणार असून येथे ५० मुलांची सोय असेल. हे केंद्र चालविण्यासाठी वर्षांला सुमारे २२ लाख रुपये खर्च येणार आहे. याचाच अर्थ प्रत्येक मुलामागे महिन्याकाठी सुमारे पाच हजार रुपये खर्च येणार आहे. ही मुले सोमवार ते शुक्रवार येथे राहतील व त्यांच्या घरी जातील, जेणे करून घरची मायाही मिळेल, असे बाळ यांनी सांगितले.
’ संपर्क पत्ता- १०२, श्रेयानंद हाऊसिंग सोसायटी, बी-केबिन रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम), ठाणे-४००६०२
’ दूरध्वनी- ९३२२२१०७०८,९३२१२७१५२०, ९१६७५४४४०९
(प्रकाश बाळ, शाम गोखले)