ठाणे : ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो, त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
कोपरी काॅलनीमधील इमारत क्रमांक १६ ही अतिधोकादायक झाल्याचे सांगत पालिकेने ती इमारत जमीनदोस्त केली आहे. यामुळे येथील रहिवाशी बेघर झाले असून याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर, दमानिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोपरी काॅलनीमधील १६ क्रमांकाच्या इमारतीत एकूण ३६ रहिवाशी होते. त्यापैकी १७ जण बिल्डर विरोधात लढत होते. त्यांना बेघर करण्यात आले आहे तर, १९ जण बिल्डर सोबत होती. त्यांना बिल्डरने गेले पाच महिने भाडे दिलेले नाही. ही बाब आयुक्त राव यांच्या निदर्शनास आणून देत बेघर झालेल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. ही मागणी त्यांनी मान्य केली आहे, असे दमानिया यांनी सांगितले.
नियमानुसार सी-वन (अतिधोकादायक) श्रेणी मध्ये इमारत असेल तर इमारत पाडून पुनर्विकास करण्यास हरकत नाही. परंतु ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो, त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते, असा गंभीर आरोप करत असाच प्रकार कोपरी काॅलनीतील १६ क्रमांकाच्या इमारतीच्या बाबतीत घडला असल्याचे त्यांनी सांगितले. बिल्डरने १४ आणि १५ क्रमांकाची इमारतीचा पुनर्विकास केल्यानंतर त्याने १६ क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास करायचे ठरवताच, ती इमारत सी-वन (अतिधोकादायक) श्रेणी मध्ये दाखविण्यात आली. २०२३ च्या अहवालानुसार ही इमारत सी टू बी (धोकादायक इमारत) या श्रेणी मध्ये होती, असा आरोपही त्यांनी केला.
ठाण्यात अशा अनेक बिल्डींग आहेत, ज्याठिकाणी बिल्डरने लक्ष घातल्यानंतर त्या इमारती सी-वन (अतिधोकादायक) श्रेणी मध्ये दाखविण्यात आल्या आहेत, अशी बाब माझ्या निदर्शनास आली असून असे प्रकार थांबले पाहिजेत. सामान्य माणसाच्या आयुष्यात घर हा सगळ्यात मोठा विषय असतो. त्यामुळे त्यांना कोणीही बिल्डर राजकारण्यांची मदत घेऊन त्यांना त्रास देणार असेल तर तसे होऊ दिल जाणार नाही. अशा सगळ्या लोकांसाठी लढायला आम्ही खंबीर आहोत आणि लढून त्यांना न्याय मिळवून देऊ, असे दमानिया यांनी सांगितले.
कोपरी काॅलनीमधील क्रमांक १६ च्या इमारतीमधील लोकांना बिल्डर न्याय देत असेल, योग्य पद्धतीने यांना वागवत असेल आणि त्यांना योग्य मोबदला देत असेल तर हे सगळे मान्य करायला तेथील रहिवाशी आधीपासून तयार आहेत. पण, राजकारणांना हाताशी धरून सामान्य माणसाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर ते थांबले पाहीजे. तसेच या प्रकरणाबाबत पालिका आयुक्त राव यांनी जे आश्वासन दिले आहे, त्याची अंमलबजावणी झाली नाही तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेईन, असेही त्या म्हणाल्या.