ठाणे : नेत्रदान, अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे (७३) यांचा वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पळून गेलेला वाहन चालक मोहम्मद शाबुद्दीन शेख (५९) याला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. शेख हा बसगाडी चालवितो. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे त्याचा शोध घेऊन अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. पुष्पा यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे नेत्रदान करण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांचे नेत्रदान झालेले पाहून जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झालेल्या आणखी एका तरुणाच्या नातेवाईकांनी त्या तरुणाचे नेत्रदान केले.
ठाण्यात राहणाऱ्या पुष्पा आगाशे या नेत्रदानाविषयी जनजागृती करत. मागील ४४ वर्षांपासून त्या नेत्रदानाच्या प्रसारासाठी सामाजिक कार्य करत होत्या. मागील काही वर्षांपासून त्या पतीसोबत अवयवदानाबाबतही जनजागृतीसाठी कार्य करत होत्या. अवयवदान आणि नेत्रदानासह ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेत. धान्य बँक चळवळीत त्या कार्यरत होत्या. गुरुवारी सकाळी त्या दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी तीन हात नाका येथे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर पुष्पा यांना मदत करण्याऐवजी वाहन चालकाने तेथून पळ काढला होता. जखमी अवस्थेत पुष्पा यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे चालकाचा शोध सुरू केला. त्यांना एका बसगाडीने धडक दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी वाहन क्रमाकांच्या आधारे चालकाचा शोध घेतला. पोलिसांनी चालक मोहम्मद शाबुद्दीन शेख याला ताब्यात घेऊन अटक केली. मोहम्मद हा कोपरी येथून वाडा या भागात ट्रॅव्हल बसगाडी घेऊन जात होता. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
पुष्पा यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबियांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुष्पा यांचे नेत्रदान केले. त्याचवेळी रुग्णालयात एका ३२ वर्षीय व्यक्तीचे आजारपणामुळे निधन झाले होते. पुष्पा यांचे नेत्रदान झाल्याचे पाहून त्या तरुणाच्या कुटुंबियांनी देखील तरुणाचे नेत्रदान केले.
सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीचे आयुष्य जगण्याऐवजी आईने पूर्णपणे सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी नेत्रदानासह विविध सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यांचे अवयवदान, त्त्वचादान करायचे होते. परंतु शवविच्छेदनामुळे ते शक्य झाले नाही. असे असले तरी नेत्रदान झाले. त्यांच्या नेत्रदानामुळे रुग्णालयात निधन झालेल्या आणखी एका तरुणाचे त्यांच्या कुटुंबाने त्याचे नेत्रदान केले. – आशिष आगाशे, पुष्पा यांचा मुलगा.