कल्याण : कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. पालिकेकडून नियमित कचरा उचलला जाऊनही शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. आरोग्याच्या प्रश्न यामधून निर्माण होत आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने सोमवार पासून कल्याणमध्ये कचऱ्याच्या ढिगावर बसून आंदोलन सुरू केले आहे.

गेल्या चार वर्षापासून पालिकेत नवीन आयुक्त आला की फक्त कचऱ्याच्या मोहिमा राबवितो. त्यामधून फलनिष्पत्ती काही होत नाही. कचरा निर्मूलनासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्यात. केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवू नयेत असे सामाजिक कार्यकर्ता मनोज वाघमारे यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील महात्मा फुले नगर, सुचकनाका भागातील कचरा गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कामगारांकडून उचलला जात नाही. या परिसरात कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. अशा साठणाऱ्या कचरा व घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. शिवाय रोगराई पसरण्याची भीतीही रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सूचक नाका परिसरातील महात्मा फुले नगर या भागात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीवासीय राहतात. उच्चभ्रू लोकवस्ती, सोसायट्यांमध्ये कचरा नियमित वेळेत उचलला जातो.

हेही वाचा : कल्याणमधील टिटवाळ्याजवळ विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला ; दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल

अशा भागात स्वच्छता कायम राखली जाते. मात्र झोपडपट्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते ? झोपडपट्ट्यांमध्ये माणसे राहत नाहीत का ? या भागातला कचरा व घाण का उचलली जात नाही ? हा भेदभाव का केला जातो ? आम्हीही करदाते नागरिक आहोत, आम्हालाही नागरी सेवा व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, कचरा व घाण वेळेत उचलली जाऊन साफसफाई देखील रोजच्या रोज करण्यात आली पाहिजे, अशी या भागातील रहिवाशांची मागणी आहे. वारंवार तक्रारी करूनही पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर याच परिसरात राहणाऱ्या मनोज वाघमारे या जागरूक रहिवाशाने सोमवारी कचऱ्याच्या ढिगावर बसून अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

Story img Loader