मागील सतरा वर्षापासून भिवंडी जवळील कोन गावातील हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करत होते. दोन वर्षापुर्वीची करोनाची महासाथ, त्यानंतर वाढलेली महागाई यामुळे उद्योजक, व्यापारी, रहिवाशांकडून वर्गणी मिळणे अवघड झाल्याने कोन मधील ड्रीम काॅम्पलेक्स सामाजिक सलोखा मंडळाने यावर्षापासून गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गडचिरोली : शीघ्रकृती दलातील जवानाचा सहकाऱ्यावर गोळीबार

ड्रीम काॅम्पलेक्स सामाजिक सलोखा गणेशोत्सव मंडळाकडे शिलकीत पुरेसा निधी होता. या निधीतून यापुढील काळात गणेशोत्सव साजरा करता आले असते. हा संपूर्ण निधी करोना महासाथीच्या काळात गोरगरीब, बेघर, गरजुंना अन्नदान, मदत कार्यासाठी खर्च करण्यात आला. त्यामुळे मंडळाकडे यापुर्वीच्या उत्सव रकमेतील शिल्लक राहिलेली नाही, असे मंडळ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दहा दिवस उत्सव साजरा करायचा असेल तर दररोज यथासांग गणेशोत्सव पूजन, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे नियोजन झाले पाहिजे. आर्थिक तरतुदी शिवाय या गोष्टी करता येत नाहीत. यापूर्वी स्वताहून व्यापारी, दुकानदार, नागरिक, उद्योजक स्वताहून गणेशोत्सवापूर्वी आपली वर्गणी द्यायचे किंवा वर्गणीसाठी कधी येणार म्हणून विचारणा करायचे. त्यामुळे उत्सव साजरा करायला निधी उपलब्ध व्हायचा. आणि आनंदाने कार्यकर्ते गणेशोत्सव साजरा करायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. दोन वर्ष करोना महासाथीने अनेक उद्योग, व्यवसाय बंद पाडले. अनेकांचा रोजगार गेला. ही परिस्थिती कमी की काय म्हणून आता महागाईने उसळी घेतली आहे. रोजचे दैनंदिन जगणे नागरिकांना असह्य झाले आहे. अशा परिस्थितीत कोणाकडे वर्गणी मागणे योग्य नाही. हा विचार मंडळ पदाधिकाऱ्यांनी केला, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> अकोला : दारूची अवैध विक्री करू देण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
भिवंडी-कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी पुला जवळील कोन गावात ड्रीम काॅम्पलेक्स गृहसंकुल आवारात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय २००३ मध्ये घेतला. या कामासाठी विकासक ईशाद खान यांनी पुढाकार घेतला. हिंदू-मुस्लिमांसह इतर धर्मिय या उत्सवात आनंदाने सहभागी होत होते. सामाजिक सलोख्याचा संदेश या गणेशोत्सवातून सर्वदूर जात होता. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यासाठी शासकीय, पोलीस यंत्रणा सहकार्य करायच्या. विविध सामाजिक उपक्रम, मनोरंजन कार्यक्रम यावेळी आयोजित केले जात होते. अनेक शासकीय, पोलीस अधिकारी आवर्जून या गणेशोत्सवाला भेट देत होते. चार वर्षापूर्वी ड्रीम काॅम्पलेक्स गणेशोत्सव मंडळाला ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात येणारा सामाजिक सलोखा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष अहमद पटेल यांनी दिली. आर्थिक चणचणीमुळे उत्सव साजरा करता येत नाही याचे सगळ्यांनाच दुख होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महागाई वाढली आहे. कोणाकडे वर्गणी मागणे योग्य वाटत नाही. करोना महासाथीने उद्योजक, व्यापारी अडचणीत आहेत. आर्थिक विवंचनेचा विचार करुन महागाई आटोक्यात येत नाही, तोपर्यंत गणेशोत्सव साजरा करायचा नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. – अहमद पटेल , कार्याध्यक्ष , सामाजिक सलोखा गणेशोत्सव मंडळ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social harmony ganeshotsav mandal in bhiwandi kon village hit by inflation amy