ठाण्याच्या के. सी. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘डेट्रोईक्स’ फेस्टिव्हलमध्ये रोबेटिक्सच्या माध्यमातून विविध विषयांशी संबंधित सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.
सोमवारपासून सुरू झालेल्या या रोबो स्पर्धामध्ये रोबो सॉकर, रोबो रेस, पिक अॅण्ड प्लेस, प्रिसिशन ड्राइव्ह, लाइन फॉलोअर, ट्विन वॉक, रॉयल एस्केप बॅटलशिप आणि अक्वाबॉटिक्स यासारख्या विविध स्पर्धा झाल्या. यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि एका रिमोट कंट्रोलवर चालणारे दोन रोबो, ‘पिक अॅण्ड प्लेस’ या स्पर्धेच्या माध्यमातून महिला समानतेपासून धूम्रपानविरोधी प्रसाराचे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देण्यात आले. ‘प्रीसिजन ड्राइव्ह’ या अशाच एका दुसऱ्या रोबोटिक्स स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला. बुधवारी या कार्यक्रमास ‘काउंटर स्ट्राइक’ या खेळातील आघाडीचा खेळाडू बेन वर्गिस उपस्थित होता. उत्साह, जल्लोशपूर्ण स्पर्धेत सहभागी विद्यार्थानी साकारलेल्या रोबोच्या करामती आणि स्पर्धेतील थरार पाहून ठाणेकर थक्क झाले.
कोपरीतील केसी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या महाविद्यालयाच्या ‘टेकफेस्ट’ला मुंबई आणि परिसरातील २० हून अधिक महाविद्यालयातील सुमारे दीड हजारांहून अधिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. वाहन निर्मितीच्या आरंभीच्या काळातील अनेक दुर्मीळ मोटारींचे प्रदर्शन आणि रॅलीने फेस्टची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या प्रदर्शनात राजदूत, जुनी स्कूटर, टोयाटोच्या दुर्मीळ जीप, मर्सिडीजच्या गाडय़ा मांडण्यात आल्या होत्या. ‘टेकफेस्ट’चे हे मोटारीच प्रमुख आकर्षण ठरल्या. संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी एच. एस. चिमा, प्राचार्य डॉ. हंसराज गेहलोत, डॉ. साईकिरण खल्ला आणि रिटा सक्तीवाल यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सुरुवात झाली.
‘बॅटलशिप’चे आकर्षण
मोबाइल आणि संगणकातील गेम्स एकत्रितरीत्या आयोजित करण्यात आले. ‘ट्विन वॉक’ या गेमच्या माध्यमातून एकाच रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने दोन रोबोटेक वाहने सारख्याच मार्गाने चालवण्याची किमया या मुलांनी केली; तर ‘रोबो सॉकर’ने चेंडू गोलपोस्टमध्ये जाण्यापासून रोखला. ‘बॅटलशिप’ या युद्धनौकांच्या लढाईने सर्वाचे लक्ष वेधले. दोन संघांच्या सारख्याच नौका मैदानात उतरून लढाईसाठी भिडल्या.
संकलन : श्रीकांत सावंत