चाळीतल्या रहिवाशांचा एकोपा कायम राहावा, सुखदु:खांची देवाणघेवाण व्हावी आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने सुरू झालेली सोडा चाळीतील होळी पन्नास वर्षांनंतरही आपले अस्तित्व टिकवून आहे. जुन्या चाळीत साजरा होणारा हा उत्सव यंदा चाळीच्या जागी उभ्या राहिलेल्या नव्या इमारतीच्या प्रांगणामध्ये साजरा केला जाणार आहे. जुन्या चाळीत राहणारे रहिवासी आणि नव्या इमारतीतील रहिवासी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करणार आहेत. सोडा चाळीतल्या होळीचे चाळ ते इमारत असे स्थित्यंतर झाले असले तरी होळी मात्र त्याच उत्साहात साजरी केली जाणार असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
कल्याणच्या शिवाजी चौक परिसरातील गीता सभागृहाजवळच्या घोसाळा रोडवरील सोडा चाळ म्हणजे ३० बिऱ्हाडांचे छोटेसे घरकुल. सरकारी कर्मचारी, गिरणी कामगार, पोलीस, खासगी कर्मचारी अशा सगळ्याच क्षेत्रांतील मंडळी या चाळीचे रहिवाशी आहेत. त्यांनीच १९६० च्या सुमारास चाळीमध्ये होळी उत्सवाला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी ही होळी म्हणजे एक प्रकारचे स्नेह संमेलन होते. चाळीतली मंडळी बाजारातून लाकडे विकत आणून होळी पेटवत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल, कलिंगड आणि भेळ अशा मेजवानीचा बेत होळीच्या निमित्ताने ठरलेला. घराघरांतून येणाऱ्या नैवेद्याने ही लज्जत आणखी वाढायची.
घरगुती पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या या होळीच्या कार्यक्रमातून चाळीने सण व्यवस्थापनाचा एक आगळा आदर्श सर्वापुढे आखून दिला होता. पुढे शैक्षणिक आणि कामानिमित्ताने चाळीत राहणाऱ्या मंडळींनी कल्याणच्या विविध भागांमध्ये स्थलांतर केले. सोडा वसाहतीच्या या इमारतीमधील सगळेच भाडेकरू आणि रहिवाशांनी २०१० मध्ये ही इमारत रिकामी करून नव्या बांधकामासाठी मोकळी करून दिली. इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही तीन वर्षे होळीचा सण हे रहिवासी एकत्रितपणे साजरा करत होते. यंदा या चाळीच्या जागी आता इमारत उभी राहिली असून तेथे काही नवे रहिवासी राहण्यासाठी आले आहेत. मात्र सगळ्यांना एकत्र आणणारा हा होळी सण या भागातील पूर्वीचे रहिवासी याही वर्षी नव्या इमारतीच्या प्रांगणात साजरा करणार आहेत.
शशिकांत ओक, प्रकाश देशपांडे, सदाशिव प्रभू, उल्हास प्रभू, शशिकांत निमकर, बाबा निमकर, विजय सोडा, प्रदीप ठक्कर, रवींद्र ओक हे पूर्वीचे चाळकरी या उत्सवासाठी जातीने हजर राहणार असून यंदाही होळी साजरी केली जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा