डोंबिवली – चार महिन्यांपूर्वी डोंबिवलीतील भूमाफियांनी देवीचापाडा येथील गणेशघाट विसर्जनाजवळील जेट्टी भागातील खारफुटीवर मातीचे भराव टाकले होते. निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या पर्यावरण दक्षता मंंडळाने याप्रकरणी शासनाकडे ऑनलाईन माध्यमातून तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंगळवारी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी देवीचापाडा खाडी किनारी भागात पाहाणी केली. या अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून शासनाकडून मातीचा भराव टाकणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तहसीलदार सचीन शेजळ, कांदळवन अधिकारी, वन विभाग, सागरी मंडळ, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले, आदित्य कदम, उज्जवल केतकर, निसर्गप्रेमी अनिल मोकल हे उपस्थित होते. देवीचापाडा गणेशघाट विसर्जन स्थळाजवळ भूमाफियांनी टाकलेल्या मातीच्या भरावाची पाहणी पथकाने केली. यावेळी ही माती टाकण्यापूर्वी खरोखरच या भागात खारफुटीची झाडे होती का. मातीचा भराव टाकण्यापूर्वी ती तोडण्यात आली होती का, असे प्रश्न पाहणी पथकाकडून करण्यात आले.

हेही वाचा – डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय कचऱ्याचे ढीग, प्रशासनाचे दुर्लक्ष; घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णांना संसर्गाची भीती

यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली विभागाच्या प्रमुख रुपाली शाईवाले यांनी मातीचा भराव टाकण्यापूर्वी या भागात खारफुटीची झाडे होती. मागील १० वर्षांपासून पर्यावरण दक्षता मंडळ या भागात पर्यावरण संंवर्धनाचे काम करते. या झाडांची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना होती. या झाडांवर मातीचा भराव टाकून ते नष्ट करण्याचा प्रयत्न माफियांंकडून सुरू होते, असे शाईवाले यांनी सांगितले.

मातीचा भराव देवीचापाडा खाडी किनारी दिवसाढवळ्या टाकण्यात येत असल्याने डोंंबिवली परिसरातील अनेक निसर्गप्रेमींनी या भरावाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तत्कालीन तहसीलदार जयराज देशमुख यांनी मंंडल अधिकारी दीपक गायकवाड यांंना याप्रकरणी तपासणी करण्याचे आदेश दिले होते. देवीचापाडा खाडी किनारी खारफुटीचे जंगल असलेल्या भागात मातीचा भराव टाकून या भागातील जैवविविधता नष्ट केली जात आहे. याविषयी स्थानिक पातळीवर कोणतीही शासकीय, पालिका यंत्रणा दखल घेत नव्हती. याविषयी शासनाकडे पर्यावरण दक्षता मंडळाने तक्रार केली होती.

कांदळवन संवर्धन करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर डोंबिवलीत कांदळवन नष्ट केले जात असेल तर ही बाब गंभीर आहे. यासाठी शासनाचे विविध विभागाचे अधिकारी मंंगळवारी देवीचापाडा खाडीकिनारी पाहाणी करण्यासाठी आले होते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या शाईवाले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनास्थळाचा पंचनामा केला. शासनाकडून मातीचा भराव टाकणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबविल्याने पालक चिंतेत, शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप

देवीचापाडा खाडी किनारी खारफुटी लागवड असली की अधिक संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित राहत होते. मंगळवारी एकाही ग्रामस्थाने पाहणी पथकासोबत हजेरी लावली नाही. मातीचा भराव टाकणारे देवीचापाडा येथील स्थानिक माफिया गायब होते. या भरावासंदर्भात ‘लोकसत्ता’ दैनिकात बातम्या आल्या होत्या. शासनाकडे याप्रकरणी तक्रारी झाल्यानंतर माफियांनी भराव टाकण्याचे काम अर्धवट सोडून दिले.

डोंबिवली देवीचापाडा खाडीकिनारी कांदळवनावर मातीचे भराव टाकण्यात आले आहेत, अशी पर्यावरण दक्षता मंडळाची तक्रार होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पाहणी, पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. – सचीन शेजळ, तहसीलदार