डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसी मधील एका नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव लोटून नाल्याची एक बाजू बांधकामासाठी बंद करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या महिन्यापासून हे काम सुरू असुनही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना नाल्यातील भराव दिसत नाही का, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालया जवळील ड्रीम पॅलेस सभागृहाच्या पाठीमागील भागातून एक नैसर्गिक नाला वाहतो. एमआयडीसी, गोळवली, रिजन्सी अनंतम भागातून पावसाळ्यात येणारे सांडपाणी या नाल्यातून खंबाळपाडा मार्गे पुढे खाडीला जाऊन मिळते. ३० ते ४० फूट रुंदीचा हा नाला आहे. या नाल्याच्या अर्ध्या भागात बांधकामाचा भराव लोटून नाल्याच्या किनारची, नाल्यामधील जलसंपदा नष्ट करण्यात आली आहे, अशा तक्रारी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केल्या.
हेही वाचा >>>जेथे शिवसेनेचा खासदार तेथे शिवसेनेचाच उमेदवार; खासदार श्रीकांत शिंदे यांचा दावा
पाऊस सुरू होण्यापूर्वी या नाल्यामधील मातीचा भराव ठेकेदाराने काढला नाही तर एमआयडीसी परिसर जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीतील काँक्रीटच्या उंच रस्त्यांनी सोसायट्या, बंगल्यांचे पाये रस्त्यापेक्षा तीन ते चार फूट खाली गेले आहेत. सोसायट्यांमधील पाणी बाहेर कसे जाईल असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत आता एमआयडीसीतील नाल्यात मातीचा भराव टाकून नाल्याची एक बाजू बंद करण्यात आल्याने पावसाळ्यात अभूतपूर्व अशी परिस्थिती या भागात निर्माण होईल, असे या भागातील नागरिकांनी सांगितले. नाल्यात पाणी अडून राहिले तर सुयोग हाॅटेल, रिजन्सी अनंतम परिसरात पावसाळ्याचे पाणी तुंबून राहील अशी भीत रहिवासी व्यक्त करतात.
हेही वाचा >>>रखडलेल्या प्रकल्पांची लवकरच पूर्तता; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, ठाण्यातील ‘क्लस्टर’ योजनेचा आरंभ
गेल्या महिन्यापासून नाल्यात मातीचा भराव आहे. हा भराव पावसाळ्यापूर्वी काढला नाही तर नाल्यातील पाणी तुंबून ते परिसरात पसरू शकते. या भागातील कंपनी आवारात पाणी घुसू शकते. हे माहिती असुनही एमआयडीसी अधिकारी याप्रकरणी कारवाई करत नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी डोंबिवली एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांना अनेक वेळा संपर्क केला. ते प्रतिसाद देत नाहीत. किंवा मी बैठकीत व्यस्त आहे, असा लघुसंदेश पाठवून ते संपर्काला पुन्हा प्रतिसाद देत नाहीत. एमआयडीसीचे इतर अधिकारीही यासंदर्भात माहिती घेऊन बोलावे लागेल अशी उत्तरे देत आहेत.
नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडविला जात असताना डोंबिवली एमआयडीसी कार्यालयाकडून याविषयी आक्रमक भूमिका घेण्यात येत नाही म्हणून काही जागरुक नागरिकांनी या प्रकरणी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पी. अनबलगन यांच्याकडे तक्रारी करण्याचा निर्णय घेतला आहे.