ठाणे: महापालिका क्षेत्रातील कोणत्या रस्त्यांवर हवा आणि धुळ प्रदुषण सर्वाधिक आहे आणि त्या मागची कारणे काय आहेत, याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या निर्देशानुसार सुरू केले आहे. यामध्ये धुळ व हवा प्रदुषण असलेल्या रस्ते आणि त्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणची माती पथकांकडून गोळा केली जात असून हे प्रदुषण बांधकामांमुळेच होत आहे का याचा शोध घेतला जात आहे. तसेच माती परिक्षणानंतर याठिकाणी कोणत्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे, याचा विचार केला जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील हवेची गुणवत्ता दोन महिन्यांपुर्वी म्हणजेच दिवाळीच्या आधी खालावली होती. त्याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने हवा प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यानुसार ठाणे महापालिकेने हवा प्रदुषणास कारणीभूत असणाऱ्या बांधकामधारकांना नोटीसा बजावल्या होत्या. राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली होती. तसेच शहरातील रस्ते पाण्याने धुण्यासही सुरूवात केली आहे. यंत्राच्या साहाय्याने रस्ते सफाई केली जात आहे.

हेही वाचा… नव्या पोलीस आयुक्तांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना दट्ट्या; पोलीस ठाण्यात नागरिकांना मिळाणाऱ्या वागणुकीचा आयुक्त घेतात थेट आढावा

सकाळ आणि रात्री अशा दोन वेळेत रस्ते सफाई केली जात आहे. असे असले तरी शहरातील काही रस्त्यांच्याकडे सातत्याने धुळ जमा होत आहे. त्याचबरोबर याठिकाणी तरंगत्या धुलीकणांचे प्रमाणही अधिक आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने नुकतेच हे प्रदुषण नेमके कशामुळे होते, याचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी धुळ प्रदुषित रस्त्याकडेची आणि परिसरातील बांधकामांच्या ठिकाणांची माती गोळा करण्याच्या सुचना समितीने दिल्या असून त्यानुसार पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाच्या पथकाने सर्वाधिक हवा प्रदुषित रस्त्यांचा शोध घेऊन तेथील माती संकलित करण्यात येत आहे. त्याचबरोबर तेथील हवेतील तरंगत्या धुलीकणाचे मोजमाप यंत्रणाच्या साहाय्याने करण्यात येत आहे.

रस्ते आणि परिसरातील बांधकामाच्या ठिकाणची माती घेऊन त्याचे परिक्षण केले जाणार आहे. त्यात बांधकाम ठिकाणीची माती रस्त्याकडेला जमा होते का किंवा वाहनांच्या चाकांना लागून येणारी माती रस्त्याकडेला जमा होते का याचा शोध घेतला जाणार आहे. त्याचबरोबर हवेतील तरंगते धुळीकण वाढण्याची कारणे काय आहेत आणि त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना करणे अपेक्षित आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमध्ये आयआयटी आणि निरी संस्थेचे प्रतिनिधी आहेत. पालिकेकडून सादर होणाऱ्या अहवालाच्या आधारे समितीचे सदस्य पालिकेला काही उपाययोजना सुचवितील, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soil testing to prevent air pollution in thane after the high court committee the municipality started soil collection dvr