घोडबंदरपाठोपाठ पूर्व द्रुतगती मार्गालगतही माती परीक्षण सुरू केल्याने वाहतुकीत अडथळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गासाठी सुरू असलेल्या माती परीक्षणामुळे घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होत असतानाच आता ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरही माती परीक्षण सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी तीनहात नाका ते माजिवाडय़ापर्यंतचा सेवा रस्ता आणि महामार्गाच्या काही भागांवर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा रस्ते आणि महामार्गावरील रस्ता अरुंद झाल्याने या ठिकाणी सायंकाळी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्याचा फटका कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना बसू लागला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून घोडबंदर भागात अनेक गृहसंकुले उभी राहिली आहेत, मात्र सार्वजनिक वाहतुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. महापालिका क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशी चार रेल्वे स्थानके आहेत. मात्र, या स्थानकांवरही प्रवाशांचा भार वाढला आहे. शहरातील वाहनांच्या संख्येतही वाढ झाल्याने रस्त्यांवर ताण पडत आहे. रेल्वे आणि रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.  मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वडाळा-घाटकोपर-कासारवडवली अशी ही मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून घोडबंदर भागातील महामार्गाच्या मधोमध बॅरिकेड लावून माती परीक्षण करण्यात येत आहे.

आधीच घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होत असताना मार्गिकेचा एक भाग बॅरिकेड लावून अडविल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. घोडबंदरपाठोपाठ आता ठाणे शहरातही मेट्रोच्या कामामुळे कोंडी होऊ लागली आहे. शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक या पूर्व द्रुतगती मार्गावरही मेट्रोच्या उभारणीसाठी माती परीक्षणचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे. त्यासाठी तीनहात नाका ते माजिवाडय़ापर्यंतचा सेवा रस्ता आणि महामार्गाचा काही भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मुंबई तसेच नवी मुंबईत कामानिमित्त खासगी वाहनाने प्रवास करणारे रोज याच मार्गावरून जातात. तसेच या मार्गावरून परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ा आणि खासगी बसची वाहतूकही मोठय़ा प्रमाणात सुरू असते. याशिवाय, परराज्यांत जाणाऱ्या बसगाडय़ाही तीनहात नाका भागातून सायंकाळी सुटतात. त्यामुळे सायंकाळी पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्याचा फटका तीनहात नाका चौकाला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गावरील वाहतुकीलाही बसू लागला आहे. तीनहात नाका ते माजिवाडय़ापर्यंतच्या सेवा रस्त्यांवरही मेट्रोच्या कामामुळे कोंडी होऊ लागली आहे.

ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मेट्रोसाठी माती परीक्षण सुरू आहे. त्यासाठी सेवा रस्ते आणि महामार्गालगत बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे होणारी कोंडी कमी करण्यासाठी या भागात बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

-अमित काळे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soil testing work for metro at ghodbunder road create traffic jam
Show comments