कल्याण-डोंबिवली महापालिकेचा वीज बचतीचा अभिनव उपक्रम
कल्याण-डोंबिवली शहर येत्या पाच वर्षांत ‘सौर शहर’ (सोलर सिटी) करण्याचा मानस प्रशासनाने आपल्या भविष्यवेध प्रकल्पात व्यक्त केला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज बचत करता येऊ शकते, असा संदेश या माध्यमातून शहरवासीयांना देण्याचा महापालिकेचा येत्या काळातील प्रयत्न आहे. कल्याणमधील काळा तलावात सौर ऊर्जेचा प्रकल्प मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येणार असून यानिमित्ताने तलावातील पाणीही उपयोगात आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे.
विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पूर्ण करताना वीजपुरवठा करणाऱ्या संस्थांची दमछाक होत आहे. प्रत्येकाने वीज बचत करावी म्हणून शासन स्तरावरून नियमित संदेश दिले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरांत सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. कल्याणमधील काळा तलावात बारमाही पाणी असते. या तलावाच्या मध्यवर्ती भागात सौर ऊर्जेचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. या माध्यमातून तयार होणारी वीज संरक्षित करण्यात येईल आणि तलावाभोवतीची जॉगिंग ट्रॅक, मनोरंजन नगरीतील विजेची व्यवस्था चालविण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
विजनिर्मितीचे प्रमाण अधिक असेल तर ही वीज आजूबाजूच्या शासकीय, निमशासकीय संस्था, रुग्णालये यांना विकण्यात येऊ शकते. या वीजविक्रीच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळणे शक्य होईल. सौर ऊर्जेवरील वीज वापरण्यात आल्याने संबंधित सरकारी कार्यालये, रुग्णालयांमधील विजेचा वापर कमी होऊ शकेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. काळा तलावामधील सौर ऊर्जेचा प्रयोग यशस्वी होताच अशाच स्वरूपाचा प्रकल्प कल्याण, डोंबिवली शहरातील अन्य भागात बारमाही पाणी असणाऱ्या तलावांमध्ये यशस्वी करता येईल का, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे सूत्राने सांगितले. वीजनिर्मिती करण्यासाठी लागणारे कोळशाचे साठे कमी होत चालले आहेत. वाढत्या लोकवस्तीमुळे विजेची मागणी वाढत चालली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेचा आदर्श घेऊन शहरवासीयांना स्थानिक पातळीवर लहान प्रकल्पांच्या माध्यमातून सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवावेत, असा संदेश देण्याचा प्रयत्न सौर शहराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे महापालिका सूत्राने सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी शहरात मोकळ्या जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांच्या हद्दीत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. पाच वर्षांतील पहिल्या तीन वर्षांत वृक्षारोपण, त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या झाडांची जनावरे व अन्य कोणाकडून हानी होऊ नये यासाठी पालकत्व स्थानिक संस्था, पर्यावरणस्नेही संस्थांकडे देण्याचा प्रयत्न असणार आहे. शहर, गाव परिसरातील रस्त्यांवर झाडे लावण्यात येणार आहेत. सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प प्रशासनाने तयार केला आहे. या झाडांमध्ये रेन ट्री, गुलमोहर, बाहवा, करंज, लिंबाडा अशी विस्तारणारी सदाहरित असणारी झाडे लावण्यात येणार आहेत, असे पालिका सूत्राने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा