लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : गृहप्रकल्पांची उभारणी करताना प्रकल्पाच्या ठिकाणी जलजन्य आजार, मलेरिया, डेंग्यु डासांची निर्मिती होणार नाही, अशा प्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या डोंबिवलीतील ११ विकासकांना घनकचरा विभागाचे डोंबिवली विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

या विकासकांमध्ये बी. आर. होमर्स, चिन्मय पाटील, राजेंद्र परांजपे, रवी-शुभंकर सोसायटी, योगिराज शेळके, श्रीकृष्ण मराठे, संदीप गुडे, अभय कामत, सचीन कटके, सौरभ उगावडे, ओमकार, नीलपद्म डेव्हलपर्स यांचा समावेश आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पालिका हद्दीत साथरोग पसरविणाऱ्या डासांची निर्मिती होणार नाही यादृष्टीने प्रतिब्ंधात्मक उपाययोजना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, घनकचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहेत. त्याच बरोबर पालिका हद्दीत गृहनिर्माण प्रकल्प उभारणाऱ्या विकासकांनी स्वताहून आपल्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाणी साठवणीसाठी तयार केलेले खड्डे, इमारतीवर स्लॅब टाकल्यानंतर त्या स्लॅबच्या भक्कमपणासाठी त्यात पाणी मुरण्यासाठी केलेल्या केलेले काँक्रिटचे चौकोन, इमारती जवळील पाण्याचे पिंप याठिकाणी पाणी साठवण करून त्यात मलेरिया, डेंग्युच्या डासांची निर्मिती होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्याची काळजी म्हणून दर सात दिवसांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी होणे आवश्यक आहे, असे देगलुकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-अंबरनाथ : वालधुनी किनारचे जुने भव्य वृक्ष कोसळले

डोंबिवलीतील नोटिसा बजावलेल्या विकासकांच्या गृहप्रकल्पांची पाहणी केल्यावर तेथे साठवण केलेल्या पाण्यात मलेरिया, डेंग्यु डासांच्या अळ्या पाण्यात आढळून आल्या. हे डास या विकासकांच्या बांधकाम प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांना चावले तर तेथून साथीचा आजार पसरण्याची भीती आहे. तसेच मजुरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असे मुख्य स्वच्छता अधिकारी देगलुकर यांनी सांगितले. त्यामुळे ११ विकसकाना नोटिसा पाठवून गृहप्रकल्पाच्या ठिकाणी डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. या कामात संबंधित विकासकांनी हलगर्जीपणा केला तर त्याची माहिती आयुक्त, उपायुक्तांसह, नगररचना विभागाला देऊन संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करण्याची शिफारस केली जाणार आहे, असे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर यांनी सांगितले. या विकासकांनी बांधकामाच्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी नियमित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे देगलुरकर यांनी सांगितले.